डॉ. गो.बं. देगलूरकर यांची टीका
पुणे : क्रमिक पुस्तके ज्यांनी लिहिले, प्रसारित केली, त्यांनी मराठ्यांचा खरा इतिहास दाबून ठेवला. दीड ते दोन पानांत मराठ्यांच्या इतिहासाची बोळवण केली. अशा शब्दांत ज्येष्ठ मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांनी पुराव्याच्या आधारावर शास्त्रशुध्दपणे ‘राजा छत्रपती’ ग्रंथातून छत्रपतींचे कतृत्व व पराक्रम लोकांसमोर आणल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
सागर देशपांडे संपादित ‘शतक पाहिलेला माणूस’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी टिळक वाड्यातील लोकमान्य सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. देगलूरकर बोलत होते. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, माजी खासदार प्रदिप रावत, डॉ. पी.डी. पाटील, अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, छत्रपतींवर आजपर्यंत जी पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातील सर्वात उत्तम पुस्तक म्हणजे पुरंदरेंचे राजा छत्रपती हेच आहे. इतिहासाच्या पुस्तकात लालित्य भाषा वापरण्यात गैर काय? उपलब्ध पुरावे आणि तत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेत इतिहास लिहिला जातो. त्यामुळे इतिहासात चुका होत असतात. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी चौकस राहून छत्रपतींचा इतिहास लिहला असल्याचेही डॉ. देगलूकर यांनी नमूद केले.
शिवचरित्रामागील उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. इतिहास मागच्या पिढीच्या चुका आणि चांगल्या गोष्टी सांगत असतो. इतिहास लोकांच्या दृष्टीतून लिहिलेला असतो, त्यामुळे त्यात लालित्य येते त्याला चूक म्हणायचे कारण नाही. त्यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे यांनीच खर्‍या अर्थांने छत्रपती महाराष्ट्रासमोर मांडला असल्याचेही डॉ. देगलूरकर यांनी सांगितले.
भूषण गोखले म्हणाले, छत्रपतींचा पराक्रम आणि साहस बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातून वाचला आहे. समुद्र किनारपट्टीही सुरक्षित ठेवण्याची दूरदृष्टी शिवाजी महाराजांकडे होती. छत्रपतींनी नुसता इतिहास घडविला नाही, तर माणसे घडविली. पुरंदरे यांनी अभ्यास करूनच गड किल्ल्यांचे वर्णन केले आहे. आज आपण सर्जिकल ट्राईक विषयी बोलत आहोत. मात्र छत्रपतीने शाहीस्तेखानावर केलेला हल्ला हेच पहिले सर्जिक स्ट्राईक असल्याचेही गोखले यांनी सांगितले.
प्रदिप रावत, सागर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
देशातंर्गत धोक्याविरोधात लढण्याची वेळ
स्वराज्याचा इतिहास आणि आत्ताचा वर्तमान यांच्यात संवाद झाला पाहिजे. काही गंभीर लढाया देशासमोर उभ्या आहेत. चीन, पाकिस्तानपेक्षा मोठे धोके समोर आहेत, त्यांच्याशी लढण्याची वेळ आली आहे. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला. मराठ्यांच्या सत्तेला नख लावल्याशिवाय भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावता येणार नाही. हे इंग्रजांनी ओळखले होते. देशासाठी जे लढले, बहुसंख्य वेळेला जिंकले, त्या इतिहासचे नाव आहे मराठ्यांचा इतिहास. शिवाजी महाराज अजून दहा वर्षे जगले असते तर मराठे तेव्हाच दिल्लीपर्यंत पोहोचले असते आणि महाराज भारताचे सत्ताधीश झाले असते. मराठ्यांचा इतिहास म्हणजे संधिकालातील तळटीप नाही, दैदीप्यमान गौरव गाथा आहे. हा इतिहास देशाला कळला पाहिजे. शिवाजी महाराज होते म्हणून आपण आज आहोत, हे देशाला कळले पाहिजे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा