राज्यपालांचा माफीनामा

मुंबई, (प्रतिनिधी) : गुजराती, राजस्तानी नागरिकांमुळे मुंबईत पैसा आहे. ते गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह यांनी सोमवारी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली.

मुंबईतील अंधेरीमधील एका चौकाला दिवंगत शांतीदेवी कोठारी यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले होते. महाराष्ट्राच्या व विशेषतः मुंबई आणि ठाण्याच्या विकासात राजस्तानी व गुजराथी समाजाचे मोठे योगदान असल्याचे सांगताना, या नागरिकांमुळेच मुंबईत पैसे आहेत व ते निघून गेलेे, तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान कोश्यारी यांनी केले होते. स्वाभाविकच याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. स्वतः राज्यपाल व भाजपच्या नेत्यांनी याबाबत बरीच सारवासारव केली. पण, राज्यपालांचे वक्तव्य नागरिकांच्या जिव्हारी लागले असून, त्याचे भविष्यात राजकीय पडसाद उमटतील हे लक्षात आल्यानंतर राज्यपालांनी काल एक प्रसिद्धिपत्रक काढून माफी मागितली.

29 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात देशातील काही समाज बांधवांच्या मुंबईच्या विकासातील योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. गेल्या तीन वर्षांत मला महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल, तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पनादेखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, अशा शब्दांत राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा