लोणावळा (वार्ताहर) : अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे धोरण लोणावळा शहर पोलिसांनी स्वीकारले आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार या मागील तीन दिवसांत अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍या तब्बल 10 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

लोणावळा शहरात बंगले भाड्याने देण्याचा व्यवसाय जोर पकडत आहे. मुंबई पुण्याकडील धनदांडग्यांनी सेकंड होम म्हणून बांधलेले बंगले आता पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. अनेकजण तर आता केवळ हा व्यवसाय करण्यासाठी बंगले खरेदी करताना दिसतात. केवळ लोणावळा शहराचा विचार केल्यास असे हजारो बंगले आहेत की, जे भाडे तत्त्वावर दिले जातात आणि छोटे मोठे ग्रुप असेल, तर हॉटेलपेक्षा हे बंगले भाड्याने घेणे पर्यटकांना ही परवडणारे असतात.

याशिवाय हॉटेलपेक्षा या बंगल्यांमधून पर्यटकांना अधिक स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे पूर्वी हॉटेल आणि रिसॉर्टकडे वळणारा पर्यटक खूप मोठ्या संख्येने या बंगल्यांकडे वळू लागला आहे.

एकीकडे अनेक नियम पायदळी तुडवीत हा व्यवसाय सुरू असताना दुसरीकडे मात्र याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मागील पंधरा दिवसात लोणावळा शहरातील अशा बंगल्यांमध्ये दोन अपघाती मृत्यू झाले.

याशिवाय बहुतांश बंगले हे रहिवासी परिसरात असल्याने त्या ठिकाणी येऊन रात्रीअपरात्री धांगडधिंगा करणार्‍या पर्यटकांमुळे आजूबाजूच्या स्थानिकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अशा अनेक तक्रारी नेहमीच पोलीस स्टेशनला जात असतात. त्यामुळे या अशा नियम पायदळी तुडवून अनधिकृत व्यवसाय करणार्‍या बंगलेधारक; तसेच मध्यस्थांवर कारवाई करण्याचा धडाका लोणावळा पोलिसांनी सुरू केला आहे.

मागील पंधरा दिवसात लोणावळ्यात दोन खाजगी बंगल्यांमध्ये दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यानंतर खाजगी बंगल्यांची कायदेशीरता व पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा प्रामुख्यांनी ऐरणीवर आल्याने पोलीस प्रशासनाकडून अनधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांवर कारवाई मोहीम हाती घेतली असल्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सांगितले.

घरगुती वापरासाठी बांधले गेलेले बंगले व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपरिषदेकडे प्राप्त होत आहे. शिवाय अशा बंगल्यांमधून बंधण्यात आलेल्या अनधिकृत स्विमिंगपूलचा सर्व्हे नगरपरिषदेकडे करण्यात आला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा