वॉशिंग्टन : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आयमान अल जवाहिरी हा अमेरिकेने अफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे.

भारतीय उपखंडात गेल्या दशकापासून दहशतवादी कारवायात अल कायदा ही दहशतवादी संघटना थैमान घालत आली आहे. संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला २०११ मध्ये पाकिस्तानात अमेरिकेने कारवाई करून ठार केले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अमेरिकेने ड्रोनचा वापर करून जवाहिरी याला संपविले आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दुजोरा दिला आहे.

ओसामा बिन लादेन याच्या हत्येनंतर जवाहिरीकडे अल कायदाची सूत्रे आली होती. तेव्हापासून अमेरिकेची गुप्‍तचर यंत्रणा सीआयए त्याच्या मागावर होती. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे जवाहिरी हा कुटुंबासह राहत असल्याचा सुगावा लागला. तो राहत असलेल्या घरावर ड्रोनद्वारे हल्‍ला करून त्याला शनिवारी सायंकाळी ठार केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली असून दहशतवाद्याला योग्य तो न्याय दिल्याचे ते म्हणाले.

जवाहिरी हा ७१ वर्षांचा होता. पेशाने इजिप्शियन शल्यचिकित्सक होता. त्यानंतर तो अल कायदाचा दुसर्‍या क्रमांकाचा म्होरक्या झाला. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला पकडून देणार्‍यास अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याला आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणूनही घोषित केले होते.

पाकिस्तानातील ओबाटाबाद येथे मे २०११ मध्ये लादेनला संपविल्यानंतर ११ वर्षे अमेरिका जवाहिरीच्या मागावर होती. हल्ल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना बायडेन म्हणाले, अतिशय अचूक हल्‍ला करून त्याला अमेरिकेने कायमचे जगातून नाहीसे केले आहे. जवाहिरी हा आपल्या घरात कडेकोट सुरक्षेत राहत होता. तो घराच्या छतावर उभा असताना ड्रोनमधून डागलेल्या दोन क्षेपणास्त्रांनी त्याला अचूक टिपले. विशेष म्हणजे त्याच्याबरोबर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही इजा झाली नाही. .

जवाहिरीचे दहशतवादी उद्योग

  • ऑक्टोबर 2000 मध्ये एडनमध्ये अमेरिकन युद्धनौकेवर आत्मघातकी हल्ल्यात हात, 17 खलाशांच्या हत्त्येचा सूत्रधार
  • 1998 मध्ये केनिया, टांझानियामधील अमेरिकन दूतावासावरील हल्ल्याचा सूत्रधार
  • 9/11 च्या हल्ल्यात विमानांचा शस्त्र म्हणून वापर केला
  • जागतिक व्यापार संघटनेच्या दोन इमारती नष्ट केल्या
  • सप्टेंबर 2014 मध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात पाळेमुळे रोवण्यासाठी भारतीय उपखंडातील अल-कायदा ही नवी संघटना तयार केली होती.

जवाहिरीवरील कारवाई

  • अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिकेची मोठी कारवाई
  • अमेरिकेच्या गुप्‍तचर यंत्रणेने त्याला हुडकून काढले
  • काबूल येथील घराच्या छतावर शनिवारी अचूक टिपले
  • ड्रोनमधून दोन क्षेपणास्त्रांनी भेदले लक्ष्य

जवाहिरी जिवंत असल्याचा दावा

जवाहिरी जिवंत असल्याचा दावा अफगाणिस्तानातील हक्‍कानी दहशतवादी संघटनेने केला आहे. तो काबूल येथे सुरक्षित असून ड्रोन हल्ल्यात ठार झाला नसल्याचे सांगितले आहे. अमेरिकेने ज्या घरावर ड्रोन हल्‍ला केला ते गृहमंत्री सिराजउद्दीन हक्‍कानी यांचे असल्याचे एका अमेरिकन विश्‍लेषकाने सांगितले, असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने छापले आहे. त्यामुळे जवाहिरी ठार झाला की अन्य कोणी ? याबाबत आता संभ्रम निर्माण झाला.

योग्य न्याय केला : बायडेन

अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या कारस्थानात त्याचा समावेश होता. 2 हजार 977 नागरिकांच्या हत्येला तो जबाबदार होता, दहशतवाद्याला यमसदनी पाठवून योग्य न्याय केला, असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. कोरोना झाल्यामुळे या हल्ल्याबाबतची पूर्व कल्पना बायडेन यांना दिलेली नव्हती. जवाहिरी ठार झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे.

ओबामांकडून कारवाईचे कौतुक

अल जवाहिरीला ड्रोनचा वापर करून संपविले आहे. म्हणजेच युद्ध न करता दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करणे शक्य असल्याचे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्‍त केले. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराला बायडेन प्रशासनाने संपविले. विशेष म्हणजे एकाही सामान्य नागरिकाला धक्‍का न लावता केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले आहे.

जवाहिरीला आश्रय दिल्याबद्दल भारताकडून अफगाणिस्तानचा निषेध

नवी दिल्‍ली : जवाहिरी ठार झाल्यामुळे अल कायदा आणि समर्थक दहशतवादी संघटनांना मोठा धक्‍का बसला आहे. तो ठार होणे भारतासाठी चांगलेच आहे, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्‍त केली आहे. परंतु भारतविरोधी कारवायांत गुंतलेल्या जवाहिरीला अफगाणिस्तानात आश्रय दिल्याबद्दल निषेध केला आहे.

जवाहिरी ठार झाल्यामुळे अल कायदाशी संबंधित भारतातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास चालना मिळेल. जवाहिरी हा भारतात अल कायदा संघटना मजबूत करण्याचे मनसुबे रचत होता. तसेच त्यासाठी प्रयत्न करत होता. आता या प्रयत्नांना नक्‍कीच आळा बसेल, असा विश्‍वास भारताने व्यक्‍त केला. जवाहिरी काबूलमध्ये मौजमजेत राहत होता. त्याची भारतीय उपखंड अल कायदा ही नवी संघटना आणि तालिबानचे जवळचे नाते होते, असे आता स्पष्ट झाल्याने भारताने तीव्र चिंता व्यक्‍त केली आहे. अल कायदासह जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा या सारख्या संघटनांना तालिबानी राजवट पाठिंबा देत असल्याबद्दल भारताने तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा