सुमारे सवाशे वर्षांपूर्वीच्या स्थितीबद्दल लोकमान्यांनी जे म्हटले ते आजही लागू पडते. उत्पन्न वाढत नसल्याने केंद्र सरकार जास्त कर लादत आहे हे नागरिक अनुभवत आहेत.
रुपयाची सध्याची घसरण ही चिंतेची बाब नक्कीच आहे. भारतीय रुपयाची किंमत कमी होण्याबाबत लोकमान्य टिळक यांनी सुमारे 130 वर्षांपूर्वी चिंतन केले होते व आपले विचार मांडले होते. ते आजच्या स्थितीस तंतोतंत लागू पडतात. ’सोन्यारुप्याचे नाणे’ या शीर्षकाखाली लोकमान्यांनी पाच अग्रलेख लिहिले होते. त्याशिवाय ’सोन्यारुप्याची लढाई’ आणि ’चांदी, रुपये आणि पौंड’ असे दोन अग्रलेख लिहिले होते. पहिल्या अग्रलेखाच्या प्रारंभीच लोकमान्य म्हणतात, ‘पूर्वी विलायतेतील सोन्याच्या एका पौंडास हिंदुस्थानातील रुप्याचे दहा रुपये द्यावे लागत असत, म्हणजे विलायतेत एक पौंडाचा माल खरेदी करण्यास इकडून दहा रुपये पाठवावे लागत. हल्ली दहाच्या ठिकाणी चढता चढता सोळा रुपये पाठविण्यापर्यंत मजल येऊन ठेपली आहे व हा हुंडीचा भाव आणखी किती चढत जाणार ह्याचे अद्याप कोणासही पुरे अनुमान होत नाही… ’रुपयाची किंमत घसरली म्हणजे काय हे त्यांनी थोडक्या; पण नेमक्या शब्दांत विशद केले आहे. त्याचा परिणाम काय होईल हे स्पष्ट करताना लोकमान्य लिहितात,… ‘हिंदुस्थानातील बहुतेक मोठ्या कामगारांचे अतिशय नुकसान होत आहे… त्यांच्याबरोबर हिंदुस्थानांतल्या रयतेचेही त्याप्रमाणे नुकसान होते.’
महाग आयातीचा उल्लेख
त्याकाळी इंग्लंड व भारतात एकच राजसत्ता होती हेही लक्षात घेतले पाहिजे. ब्रिटिश राजसत्ता इंग्लंड व भारतातील चलनाचे विनिमय दर ठरवत होती. या अग्रलेखात लोकमान्यांनी ‘पैसा’ या शब्दाची उकल केली आहे. त्यांनी पैसा याऐवजी ’नाणे’ हा शब्द वापरला आहे. आधुनिक अर्थशास्त्रातही चलनविषयक यासाठी ’ंमॉनेटरी’ हा शब्द वापरतात. ’इंटरनॅशनल मॉनेटरी फंड’ म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय ‘नाणे’निधी’ आहे. चलनाची क्रयशक्ती घटण्याबद्दल लोकमान्य लिहितात,… ‘रुपयाची किंमत उतरत जाऊन म्हणजे रुपयास चार पायली धान्य मिळत होते, तेथे दोन पायली मिळावयास लागून कोणाकडे दहाचे वीस रुपये झाले, तर त्याचा ह्यापासून काही एक फायदा नाही’. सध्या भारतातील स्थिती फार वेगळी नाही. आता रुपया रुप्याचा नाही आणि कोणी परकीय सत्ता रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवत नाही; परंतु सामान्यांची सर्वसाधारण स्थिती लोकमान्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आहे. रुपयाच्या घसरणीने आयात महागत आहे. याचाही विचार लोकमान्यांनी 1892 मध्ये केला होता. ‘नाणे स्वस्त किंवा महाग झाल्याने इतर देशांबरोबर आपल्या देशाचा जो व्यापार चाललेला असतो त्यासही याच मानाने कमीजास्त धक्का बसतो. तेव्हा नाण्याची किंमत सदोदित सारखी राहील याची तजवीज केली पाहिजे.‘ त्या काळात धातूची नाणी असत. पौंड सोन्याचा व भारतीय रुपया रुप्याचा असल्याने मूल्यांत फरक पडत होता. ’नाणे ही देवघेवीची खूण आहे’ या शब्दांत लोकमान्यांनी ’चलना’च्या कार्याचे अचूक वर्णन केले आहे. त्या काळात ‘हिंदुस्थानातील सरकार’ ब्रिटिश राजसत्तेस दरवर्षी ’होम चार्जेस’ या नावाखाली सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये पाठवत असे. मुळात ही रक्कम त्या काळात प्रचंड होती. त्यातून ती पौंडात पाठवायची असल्याने जास्त रुपये लागत होते. हा फाजील खर्च भरून काढण्याकरिता अर्थातच मिठाच्या करासारख्या त्रासदायक करांचा बोजा वाढवणे सरकारास भाग पडले…’ असे लोकमान्यांनी नमूद केले आहे. सरकारने ’निरुपायाने’ हे पाऊल उचलले असे म्हणताना ती सरकारच्या धोरणावरील छुपी टीका आहे हे लक्षात येते. जनतेने आपल्यावरील बोजा कमी करण्यासाठी स्वदेशी वस्तू वापराव्यात असे आवाहन लोकमान्यांनी विविध अग्रलेखांतून केले होते. जरी आता स्वदेशी माल परदेशी मालाच्या तुलनेत महाग वाटला तरी त्याला मागणी वाढल्यास त्याचे देशांतर्गत उत्पादन वाढून हळूहळू त्याच्याही किंमती उतरतील, असे विवेचन लोकमान्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने कापडाचे उदाहरण घेतले आहे. ’देशातील उद्योगधंद्यास उत्तेजन देण्याकरिता परदेशी मालावर जकात बसविण्याचे तत्त्व बहुतेक सुधारलेल्या राष्ट्रांस आता मान्य झाले आहे व राजकीय जकात बसवून जो हेतु सिद्धीस न्यावयाचा तोच हेतु लोकांनी स्वदेशी माल वापरल्याने तडीस जातो,’ असे लोकमान्यांनी म्हटले होते.
’स्वदेशी’चा विसर
पण भारत ’जागतिक व्यापार संघटने’चा सदस्य असल्याने आयात शुल्क फार वाढवता येत नाही. आता डॉलरच्या तुलनेत एखाद्या चलनाच्या मूल्याचे मापन केले जाते. रुपयाची किंमत स्थिर राखण्यासाठी सरकारकडे फार कमी उपाय आहेत. आयात निर्यातीतील तूट सातत्याने वाढत असल्याने परकीय चलनाची गंगाजळी आटत आहे. त्यामुळेही रुपयाची किंमत घटत आहे; पण स्वदेशीस आता थारा मिळत नाही. परदेशी कंपन्यांना निमंत्रण दिले जात आहे. परदेशी कंपन्यांबरोबर संयुक्त प्रकल्प (जे व्ही) उभारण्यास भारतीय कंपन्या उत्सुक आहेत. रुपया सावरण्यास रिझर्व बँकही एका मर्यादेपलीकडे प्रयत्न करताना दिसत नाही. उत्पन्न वाढवून रुपया स्थिर करण्याची योजना सरकारकडे नाही. एवंच, रुपयाची घसरण चालूच राहणार व भारतीयांना वाढत्या महागाईस तोंड द्यावे लागणार हे स्पष्ट आहे.
लोकमान्य टिळक विचार दर्शन
देशांतील विद्यापीठरं हीं चांगलीं व सामर्थ्यवान् माणसें निष्पन्न करण्याच्या टांकसाळी होत.
लोकांमध्ये सलोखा राखणें व एकमेकांतील प्रेमभाव वाढवणें हेंच खर्या राज्यनीतीचें बीज होय.
देशाच्या इतिहासांत आणीबाणीचे प्रसंग क्वचित्च येत असतात. आणि जेव्हा येतात तेव्हां आपण जर त्यांचा फायदा करून घेतला नाहीं तर आमच्या मूर्खपणाची आणि कर्तव्यशून्यतेची कमाल झाली असें म्हणावें लागेल.
खरा उत्सव म्हणजे ज्यापासून आपल्या प्रगतीला मदत होते तो.
वेळ येईल-संधी येईल-म्हणून तिची वाट पहात बसूं नका; वेळ-संधि-आपल्या कर्तबगारीनें आणा.
लोकसंरक्षण जसें सरकारचें कर्तव्य, तसेंच लोकशिक्षणहि सरकारचें कर्तव्य आहे.
नुसत्या संस्था स्थापण्यानें कांहीं व्हायचें नाहीं, त्यांमध्यें कार्यकारी
माणसें पाहिजेत.