राऊतांना अटक झाल्या नंतर जे पी नड्डा यांचे वक्तव्य

मुंबई : देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला.

जे पी नड्डा म्हणाले “भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी त्यांनी केला.

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे”.

आपल्या विचारधारेमुळे सर्व राज्यांमध्ये कमळ फुलेल असा विश्वास जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. या विचारधारेमुळेच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याचं ते म्हणाले. “काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत,” असा टोला जे पी नड्डा यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा