डेहराडून : उत्तराखंडमधील बऱ्याच भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. शनिवारी बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्याने सुमारे २५० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामध्ये बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिराकडे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे.

धाराचुल्‍ला येथे सहा घरांचे नुकसान झाले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बऱ्याच घरातून नागरिकांना सुरक्षित स्थळी अगोदरच हलवले आहे. कुमाउ येथून मदतकार्य पथक रवाना केले आहे. पिठोरागढ प्रशासनाने धाराचुल्‍ला येथून १७ घरांतून ५३ जणांची सुटका केली आहे.

डेहराडून येथे मुसळधार वृष्टी होत असून डोंगराळ आणि सखल भागात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ऋषीकेेश बद्रीनाथ महामार्ग लॅमबागड भागात सुमारे 10 ते 15 मीटर खचला आहे. तसेच ऋषीकेश केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग बनसवारा येथे बंद झाला आहे.

पावसामुळे दरडी कोसळून सुमारेे 11 राज्य महामार्ग आणि 239 ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.. जनाकिछट्टी ते यमुनोत्रीकडे जाणारा गिर्यारोहणाचा मार्ग हा भानेलीगड येथे दरड कोसळल्याने बंद आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा