सख्खे पुतणे निहार शिंदे गटात; विधान परिषदेतही शिंदे गट

मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या बहुतांश आमदार-खासदारांनी साथ सोडल्याने एकाकी पडलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही दुफळी झाली आहे. वहिनी स्मिता ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव यांचे दुसरे बंधू स्व. बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान विधानसभा व लोकसभेनंतर विधान परिषदेतील शिवसेना आमदारही स्वतंत्र गट करण्याच्या तयारीत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. विधानसभेतील 55 पैकी 40 आमदारांनी उद्धव यांच्या नेतृत्वाविरुद्ध उठाव केल्यानंतर 18 पैकी 12 खासदारांनी लोकसभेत वेगळा गट केला आहे. पक्षाच्या अनेक आजी-माजी आमदार-खासदारांनी तसेच पदाधिकार्‍यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याची घोषणा केली आहे. आता हे फुटीचे लोण ठाकरे कुटुंबापर्यंत गेले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो, शिवसेना पुढे नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

काल उद्धव ठाकरे यांचे दिवंगत थोरले बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली. निहार ठाकरे हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. राजकारणात काम करण्याची त्यांची इच्छा असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत. मी एक वकील आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या वाटचालीत जी काही कायदेशीर मदत लागेल ती करायला आपण तयार असल्याचे निहार यांनी स्पष्ट केले. आमदार, खासदार व पक्ष पदाधिकर्‍यांसोबतच नव्या शिवसेनेत विस्मृतीत गेलेल्या नेत्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेच्या उभारणीला हातभार लावलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तसेच लिलाधर डाके यांचीही शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते.

विधानसभा व लोकसभेपाठोपाठ विधान परिषदेतील काही आमदार शिंदे यांच्या सोबत जाण्याच्या तयारीत असून, तसे झाल्यास शिवसेनेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदही मिळू शकणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा