विस्ताराला मुहूर्त कधी?

‘विस्ताराला मुहूर्त कधी’ हा राज्यातील सर्वांनाच पडलेला प्रश्न. मात्र याचे उत्तर एकमेव जोडीच देऊ शकते. घाईघाईने सत्तांतर झाले, महाशक्तीने सर्व ताकद लावली, यंत्रणा कामाला लागल्या. मात्र यावेळी पहाटेचा शपथविधीचा मोह टाळला गेला. आता फोडाफोडी करून सरकार स्थापन झाले. मात्र गेल्या 26 दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार काही होऊ शकला नाही आणि भविष्यात कधी होईल याबाबत देखील अनिश्चितताच आहे. याला कारणे देखील अनेक आहेत. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना कायदेशीर कोणाची, सरकारचा शपथविधी कायदेशीर की बेकायदेशीर, अशा अनेक कायदेशीर पेचप्रसंगांची कल्पना असल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडत आहे. त्याच बरोबर मंत्रीमंडळ विस्तार नंतर संधी न मिळणार्‍यांची भूमिका काय असणार हाही प्रश्नच आहे. हम दो हमारे दो असे किती काळ चालत रहाणार? राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहे, त्यासाठी खात्यांना मंत्री आवश्यक आहे. गेल्या सव्वीस दिवसात राज्यात 90 च्या आसपास आत्महत्या झाल्या, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्रात गोंधळात गोंधळ सुरूच आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांना स्वतः जावे लागले. शेतीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. एकूणच घिसाडघाईने सत्तांतर तर झाले, मात्र प्रशासनाचा गाडा हाकलण्यासाठी मंत्रिमंडळच नसल्याने राज्याच्या कारभारावर विपरीत परिणाम होणे साहजिकच आहे. मात्र सत्ताकारणाच्या खेळात आपआपल्या सोयीनुसार भूमिका घेतल्या जात आहेत आणि यात जनता मात्र वेठीस धरली जात आहे. हे असे किती काळ चालत राहणार?

अनंत बोरसे, शहापूर, जि. ठाणे

अरेरे! अजूनही तेच चालू

पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्येचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राज्यात गर्भाचे निदान करून तो गर्भ मुलीचा असल्यास गर्भपाताद्वारे काढून टाकण्याच्या अमानवी प्रकारावर पायबंद घालण्यासाठी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा 2003 अस्तित्वात आहे. परंतु, या कायद्याची तमा न बाळगता क्रूरतेची सीमा गाठणारी एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात उघडकीस आली आहे. दुसरा गर्भही मुलीचाच आहे असे निदान करून एका महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध सक्तीने गर्भपात करण्यात आला आहे. दुसरीकडे आजही समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजल्या आहेत याचे प्रत्यंतर एका आक्षेपार्ह घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमधील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत एका आदिवासी मुलीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिले नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावले, तर ते झाड जळून जाते, जगत नाही, असे म्हणत त्या शिक्षकाने तिला वृक्षारोपण करण्यावाचून रोखले. आश्चर्य म्हणजे एका सुशिक्षित शिक्षकानेच असे अंधश्रद्धेचे ज्ञान पाजळावे म्हणजे अंधश्रद्धेचा कळसच म्हणावा लागेल. या दोन घटनांमुळे, एकविसाव्या शतकातील जग आधुनिक तंत्रज्ञानाने एका क्लिकवर आले असले, तरीही समाजमन मात्र आजही वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात न घेता अंधश्रद्धांच्या मानसिकतेत गुंतून पडल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

गडकरी कंटाळले?

भारत सरकारमधील सर्वांत कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी सध्याच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळल्याचे चित्र आहे. यामुळेच त्यांनी थेट राजकारण सोडण्याची भाषा केल्याची बातमी वाचनात आली. पूर्वी राजकारण म्हणजे समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण व सत्ताकारण होते. मात्र आता राजकारण हे 100 टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण केव्हा सोडू आणि केव्हा नको असे वाटत असल्याचे नितीन गडकरींनी नागपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान सांगितल्याचे समोर आले आहे आणि ते खरेच आहे. दिवसेंदिवस राजकारणाची दिशा बदलत आहे. आज हिंदुस्थानात अनेक गोष्टींची अग्निपरीक्षा सुरू आहे, न्याय, लोकशाही, संसदीय लोकशाही, माणुसकी, वृत्तपत्र, व्यक्‍तिस्वातंत्र्य, अखंडता टिकणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा गडकरींना नागपुरातूनच मिळत असावी ,म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असे म्हणण्यास वाव आहे. बाकी नितीन गडकरी अस्वस्थ आहेत हे मात्र नक्की.

राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा