पुणे : शहरात ऑनलाइन अॅपवरून प्रवासी वाहतूक करणार्यास केवळ ओला आणि उबेरच्या टॅक्सीला परवानगी आहे. मात्र रिक्षा आणि दुचाकीवरूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू आहे. रिक्षा आणि दुचाकीवरून प्रवासी वाहतूकीला आरटीओची परवानगी नसल्याने ती वाहतूक बेकायदा आहे. दुचाकी प्रवासाबाबत प्रवाशांना तक्रार करण्याची सुविधा नसल्याने बेकायदा वाहतूकीतील प्रवासी सुरक्षा वार्यावर आहे. सद्य:स्थितीत शहरात बेकायदा रिक्षा व दुचाकीचा सुळसुळाट आहे.
शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांची संख्या सुमारे एक ते सव्वा लाख इतकी आहे. त्यातील सुमारे 60 ते 70 हजार रिक्षा ओला, उबेरचा अॅप वापरून त्यावर येणार्या प्रवाशांच्या मागणीनुसार वाहतूक सुविधा पुरवितात. तसेच ओला, उबेर आणि रॅपीडो अॅपवरून प्रवासी वाहतूक करणार्या दुचाकीची संख्या सुमारे 30 हजाराच्या जवळपास आहे. तर अॅपवरून अधिकृत प्रवासी वाहतूक करणार्या टॅक्सीची संख्या सुमारे 15 ते 20 हजार इतकी आहे. यातील टॅक्सी अधिकृत असली, तरी रिक्षा आणि दुचाकी मात्र बेकायदा आहे.
रॅपीडो अॅपवरून प्रवाशांना दुचाकी सेवा दिली जाते. त्यासाठी टॅक्सी आणि रिक्षाच्या तुलनेने पैसेही कमी आकारले जातात. मात्र ही सेवा केवळ अॅपवरून दिली जात असल्याने प्रवासा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबत तक्रार कोठे करणार? विशेष म्हणजे प्रवासासाठी वापरल्या जाणार्या दुचाकीची कागदपत्रे पूर्ण नसतात, तर काही वेळश चालकाकडे वाहन परवानाच नसतो. विशेष म्हणजे हे दुचाकी चालक स्वत:ची वाहने वापरत असल्याने ते वेग मर्यादाचे उल्लघंन करतात. त्यामुळे या सर्व प्रकारात प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काट? असा प्रश्न रिक्षा संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटी प्रशासनाकडे या बेकायदा प्रवासी वाहतूकीवर कारवाई करण्याबाबत वारंवार मागणी केली जात आहे.
दरम्यानच्या काळात आरटीओ प्रशासनाने बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांना आळा घालण्यासाठी शोध मोहिम सुरू केली होती. काही वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती, तर काही वाहने जप्त करण्यात आली होती. मात्र आरटीओची कारवाई थांबल्यानंतर पुन्हा एकदा बेकायदा प्रवासी वाहनांचा सुळसुळात शहरात वाढला असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रिक्षा, दुचाकी बेकायदाच
शहरात ऑनलाइन अॅपवरून प्रवासी वाहतूक करण्यास केवळ ओला, उबेरच्या टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. रिक्षा किंवा दुचाकीला प्रवासी वाहतूकीस कोणत्याच प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. ऑनलाइन बुकींग घेऊन रिक्षा आणि दुचाकीवरून प्रवासी वाहतूक होत असेल, तर ती बेकायदा आहे.
- डॉ. अजित शिंदे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी