देगलूरकर यांचे ठाम प्रतिपादन
पुणे : ब्रिटिशांमुळे समाजात निर्माण झालेला न्यूनगंड दूर करण्यासाठी लोकमान्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. त्याचबरोबर देशाचे वैभव, अभिमान, अस्मिता आणि प्राचीन काळातील गौरवाकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे ते ‘सनातनी’ असल्याचा गैरसमजही निर्माण झाला. मात्र, त्यांच्या विविध कृतींतून ते प्रागतिक विचारांचे असल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन डेक्कन अभिमत विद्यापीठाच्या पुरातत्त्व विद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन महाविद्यालय व इतिहास संकलन समिती (पश्चिम प्रांत) यांच्या वतीने आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे फर्ग्युसन महाविद्यालयात उद्घाटन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. पी. जामखेडकर, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष घुगे यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देगलूरकर म्हणाले, ‘राष्ट्र भावना’ हा मंत्र समाजात रुजविण्यासाठी लोकमान्यांनी पुढाकार घेतला होता.
समाजकारण, राजकारण, धर्मकारणाद्वारे क्रांतिकारकांना प्रोत्साहन देऊन विद्वत जगात अलौकिक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्याचबरोबर लोकशक्तीची आराधना करून जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांची देशाचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळख निर्माण झाली. कुंटे म्हणाले, ‘ब्रिटिशांविरोधात विविध माध्यमांतून असंतोष निर्माण करण्याचे कार्य लोकमान्यांनी केले. त्याचा परिणाम सैन्यामधील असंतोष जागृत करण्यात झाला. ज्या परिस्थितीत जे करता येईल ते देशाच्या स्वातंत्र्यासाठीच करेन, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी समाजाला जागृत अवस्थेत आणून ठेवले. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आवश्यक असा भक्कम पाया निर्माण झाला. स्वातंत्र्य मिळवून देणार्या लोकमान्य टिळक पर्वाचा अभिमान वाटतो.’
परिषदेच्या दुसर्या सत्रात डॉ. सदानंद मोरे यांनी ‘लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय चळवळ,’ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी ‘लोकमान्य टिळक अणि राष्ट्रीय संस्कृती,’ प्रा. विनय चाटी यांनी ‘टिळक आणि पत्रकारिता’ या विषयावर आपले विचार मांडले. तिसर्या सत्रात डॉ. भूषण फडतरे यांनी ‘लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय चळवळ,’ डॉ. अशोक कामत यांनी ‘लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय भाषा’ या विषयावर आपले विचार मांडले. डॉ. सुवासिनी देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक व स्वागत, डॉ. शिवानी लिमये यांनी सूत्रसंचालन केले. तर, डॉ. अपराजिता मुरदे यांनी आभार मानले.