नवी दिल्‍ली ः राष्ट्रपतिपदासाठी आज (सोमवारी) मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू व संयुक्‍त पुरोगामी आघाडीची (यूपीए) उमेदवार यशवंत सिन्हा निवडणूक रिंगणात उभे असून या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दि. 21 रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, ही दोन व्यक्‍तींची नव्हे, तर दोन विचारसरणींची लढाई आहे, ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याला मतदान करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचे पारडे वरचढ समजले जात आहे. शिवसेनेनेपाठोपाठ झारखंड मुक्ती मोर्चानेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे मुर्मू यांना जवळपास 61 टक्के मते निश्चित झाली असून, त्यांची या निवडणुकीतील वाटचाल आणखी सुकर झाली आहे. मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल होत्या; तसेच त्यांच्या रुपाने देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे झारखंड मुक्‍ती मोर्चाकडून सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज भरताना मुर्मू यांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष अशी जवळपास 50 टक्के मते होती. आता त्यांना बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तेलगू देसम पक्ष, संयुक्त जनता दल, अण्णा द्रमुक, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य आणि सर्व राज्यांचे आमदार यांना मतदानाचा अधिकार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या मतांचे मूल्य निश्चित करण्यात आले असून सर्व मतांचे एकूण मूल्य दहा लाख 86 हजार 431 इतके आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांच्या मतांचे मूल्य 3.08 लाख आहे. ओडिशामध्ये 114 आमदार आणि लोकसभा व राज्यसभेत अनुक्रमे 12 व नऊ सदस्य असणार्‍या बिजू जनता दलाकडे 32 हजार मते आहेत. याशिवाय, अण्णा द्रमुककडे 17 हजार 200, वायएसआर काँग्रेसकडे 44 हजार मते आहेत. तेलगू देसम पक्षाकडे 6 हजार 500 मते, शिवसेनेकडे 25 हजार तर धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे 5 हजार 600 मते आहेत.
राज्यसभेत 92 आणि लोकसभेत 301 असे भाजपकडे 393 खासदारांचे संख्याबळ आहे. यातील चार खासदार राष्ट्रपती नियुक्त असून, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्याचा भाजपला निश्चितच फायदा होणार आहे. याशिवाय, संयुक्त जनता दलाकडे 21 खासदार आहेत. राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष, अपना दल आणि ईशान्य भारतातील छोट्या पक्षांकडील खासदारांची संख्या लक्षात घेऊन मुर्मू यांना किमान 440 खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो. त्या तुलनेमध्ये यूपीएकडे 180 खासदार आहेत. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा एनडीएला फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा