लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पक्षातील ४० खासदारांनी राजीनामा दिल्याने राजकीय दबाव वाढला होता. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षात राजीनाम्याची लाट सुरु झाली. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४ कॅबिनेट, २२ मंत्री आणि २२ खासदारांचे सचिव आणि इतर ५ जणांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधानपद सोडण्यास तयार झाले. जोपर्यंत ब्रिटनच्या पतंप्रधानपदी नव्या व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत जॉन्सन पदावर कायम राहणार आहेत.अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ऋषी सुनक यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ब्रिटनचे ते भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ठरतील.
ऋषी सुनक नेमके कोण आहेत याची थोडक्यात माहिती घेऊ.
बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात ऋषी सुनक यांना अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती. ऋषी सुनक २०२० पासून अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांचे वय ४२ वर्षे आहे. ब्रिटनचे माजी संरक्षण सचिव पेन्नी मॉर्डंट यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. कोरोना साथीच्या काळात उद्योग आणि कामगारांसाठी दिलेल्या मदतीमुळे सुनक यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. ऋषी सुनक हे दिषी या नावाने देखील ओळखले जातात.
ऋषी सुनक निर्व्यसनी असून कोरोना संसर्गाच्या काळात योग्य प्रकारे जबाबदारी हाताळली होती. सुनक यांचे कुटुंबीय पंजाबमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मुर्ती यांची भेट कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
ऋषी सुनक यांनी सरकार मधून बाहेर पडणे दुःखद असल्याचे म्हटले होते. मात्र, खूप विचार केल्यानंतर या निर्णयापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जनता सरकारने योग्य प्रकारे आणि गांभीर्याने काम करण्याची अपेक्षा करते. हे माझे अखेरचे मंत्रिपद असेल मात्र तत्वांसाठी लढणं आवश्यक असल्याचे म्हणत सुनक यांनी राजीनामा दिला. सुनक यांच्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिला. यानंतर ब्रिटनमध्ये राजीनाम्याची लाट सुरु झाली.