लंडन : तीन ग्रँडस्लॅम विजेता अँडी मरे आणि गतवर्षीच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेची विजेती एमा रॅडूकानू या ब्रिटिश खेळाडूंचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसर्‍याच फेरीत संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत 20व्या मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नरने मरेवर 6-4, 7-6 (7-4), 6-7 (3-7), 6-4 अशी सरशी साधली. अन्य लढतीत, स्पेनचा युवा प्रतिभावान खेळाडू कार्लोस अल्कराझने नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूअरला 6-4, 7-6 (7-0), 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. इटलीच्या यानिक सिन्नरने स्वीडनच्या मिकाइल यमेरवर 6-4, 6-3, 5-7, 6-2 अशी, तर नवव्या मानांकित कॅमरून नॉरीने क्वामे मुनारवर 6-4, 3-6, 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत 10व्या मानांकित रॅडूकानूने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाकडून 3-6, 3-6 अशी हार पत्करली.

ओन्स जाबेऊरने मात्र अप्रतिम खेळ करताना पोलंडच्या कावाचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडवत तिसरी फेरी गाठली. तसेच पॉला बदोसाने रोमेनियाच्या एरिना बारावर 6-3, 6-2 अशी मात केली. मारिया सक्कारीनेही आगेकूच करताना व्हिक्टोरिया टोमोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला.

मिर्झा-हरादेका पराभूत

भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची साथीदार लुसी हरादेका या सहाव्या मानांकित जोडीवर पोलंडची माग्दालेना फ्रेंच आणि ब्राझीलची बिएट्रीझ हदाद माइ या बिगरमानांकित जोडीने 6-4, 4-6, 2-6 अशी मात केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा