लंडन : गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा विजयारंभ केला. तसेच पुरुषांमध्ये नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि महिलांमध्ये अॅनेट कोंटाव्हेट या मानांकित खेळाडूंनी दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित पोलंडच्या हबर्ट हुरकाझला मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. अग्रमानांकित जोकोव्हिचने दोन तास 27 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत कोरियाच्या क्वान सून-वूला 6-3, 3-6, 6-3, 6-4 असे नमवले. तिसर्या मानांकित कॅस्पर रुडने स्पेनच्या अॅल्बर्ट रामोस-व्हिनोलासवर 7-6 (7-1), 7-6 (11-9), 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. परंतु, स्पेनच्या अलेहांद्रो डाव्हिडोव्हिच फोकिनाने पहिल्याच दिवशी धक्कादायक विजयाची नोंद करताना हुरकाझचा 6-7 (4-7), 4-6, 7-5, 6-2, 6-7 (8-10) असा पराभव केला. ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरुन नॉरीने स्पेनच्या पाब्लो अँडूजारला 6-0, 7-6 (7-3), 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत दुसर्या फेरीत धडक मारली.
Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing