कोरोना रुग्णांची संख्या वाढली
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी 360 नवीन बाधितांची नोंद झाली, तर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 1664 पोहोचली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र पालखीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने पालिकेकडून त्याबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 50
पेक्षाही खाली आली होती. महापालिकेने दैनंदिन बाधितांची आकडेवारी जाहीर करणेही थांबवले होते. मात्र, गेल्या दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
गुरुवारी शहरात 360 नवबाधितांची नोंद झाली. यामधील अतिशय कमी रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एका रुग्णाला ‘नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलटर’वर ठेवण्यात आले आहे. तर दोघांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे सहव्याधीग्रस्त आहेत. ‘करोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ दिसून येत आहे. मात्र, सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे,’ असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
‘कोरोनाचे सौम्य स्वरूप आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागणार्या किंवा ऑक्सिजनची गरज भासणार्या रुग्णांची संख्या कमी राहील. मात्र, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे,’ असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले.