भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली, तर त्या भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती ठरतील! द्रौपदी मुर्मू यांनी यापूर्वी झारखंडमध्ये इतिहास रचला आहे. 2000 मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या मुर्मू या पहिल्या राज्यपाल होत्या.

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत या पदावर काम केले. भुवनेश्वरच्या रमा देवी महिला महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक म्हणून केली. यानंतर मयूरभंज विधानसभा मतदारसंघातून दोनदा (2000, 2009) आमदार म्हणून निवडून आल्या. मुर्मू हे ओडिशातील भाजप आणि बीजेडीच्या युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या.

लिपिक म्हणून काम

द्रौपदी मुर्मू यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी मिळवली आहे. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणूनही कार्यरत होत्या.

आदिवासी समाजातील लोकांना मोफत शिक्षण

द्रौपदी मुर्मू यांनी राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, ओडिशातील रायरंगपूर शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. आदिवासी समाजाप्रती त्यांची सेवाभावना एवढी आहे की, आदिवासींच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे चालवल्या जाणार्‍या अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये पगार न घेता आदिवासी समाजातील लोकांना त्या शिक्षण देत होत्या.

मुर्मू यांच्यासमोर यशवंत सिन्हा यांचे आव्हान

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात विरोधकांनी भाजप सरकारमध्ये संरक्षण मंत्री असलेले यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले आहे.
राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जून आहे आणि मतदानाची तारीख 18 जुलै आहे. यानंतर 21 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. जर द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती बनल्या, तर त्या देशाच्या 16व्या राष्ट्रपती असतील आणि देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती असतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा