पुणे : गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी, यंदा तीव्र उन्हाळा असल्याने वाढलेली पाण्याची मागणी, धरणांमधील पाण्याचे झालेले बाष्पीभवन, ग्रामीण भागासाठी घेतलेले एक जादा आवर्तन आणि जून महिन्यात न झालेला पाऊस त्यामुळे यंदा खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांमध्ये आजअखेर गेल्या पाच वर्षांतील निचांकी 3.29 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

सन 2020 मध्ये लांबलेला पाऊस, पावसाळा संपल्यानंतरही दर महिन्यात झालेला पाऊस आणि मे महिन्यात चक्रीवादळामुळे झालेला पाऊस यामुळे गेल्या वर्षी सन 2021 मध्ये धरणांत 7.84 टीएमसी पाणीसाठा होता. 21 जून रोजी सन 2020 आणि सन 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणे काठोकाठ भरलेली होती. त्यामुळे सन 2020 मध्ये 5.81, तर सन 2019 मध्ये तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा होता. परिणामी सन 2019 आणि 2020 मध्ये जलसंपदा विभागाला शहरी आणि ग्रामीण भागाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता आला. तसेच सन 2019 मध्ये ‘निसर्ग’, तर सन 2020 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार वादळी पाऊस झाला होता. त्यामुळेही जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमधील पाणीसाठा फारसा कमी झालेला नव्हता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सन 2016 मध्ये निम्मा जून महिना संपल्यानंतरही मोसमी पावसाचे आगमन झाले नव्हते. तेव्हा धरणांमध्ये अवघा दोन टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून चाचपणी सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात ती वेळ आली नाही. सन 2017 मध्ये 14 जूनपर्यंत मोसमी पाऊस सक्रिय झाला नव्हता. त्यामुळे 21 जूनपर्यंत खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत 2.86 टीएमसी पाणीसाठा होता. सन 2018 मध्ये मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षांतील 21 जून रोजीचा धरणांमधील एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये


2022 3.29
2021 7.84
2020 5.81
2019 3.00
2018 3.15
2017 2.86

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा