मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर प्रथमच मौन सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सत्तासंघर्षातून आपण सहजासहजी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मित्रपक्षांचे नेते विश्वास व्यक्त करत असताना आपल्याच पक्षाच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. एकाही आमदाराने आपण मुख्यमंत्रिपदाला लायक नाही, असे स्पष्टपणे तोंडावर येऊन सांगितले; तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देण्याची आपली तयारी आहे. त्यासाठी सुरतला जाऊन मागणी करण्याची गरज नाही, असे सांगताना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 35 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल प्रथमच समाजमाध्यमाच्याद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा तयार असल्याचे सांगतानाच या सत्तासंघर्षात आपण अखेरपर्यंत लढणार असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मला दूरध्वनी करून आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असे सांगितले. मात्र, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, तर काय बोलायचे. कुर्‍हाडीचा दांडा गोताला काळ ठरतो, असे म्हणतात. आपण मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाही, असे कोणाला वाटत असेल, तर स्पष्टपणे मला सांगा. मी पदाचा राजीनामा देईन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मला पदांचा मोह नाही. हे सरकार स्थापन होत असतानादेखील जेव्हा तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी मला एका मिनिटासाठी बाजूला नेले व सांगितले की, जर हे सरकार चालायचे असेल, तर तुम्हीच मुख्यमंत्रिपद स्वीकारले पाहिजे. तेव्हादेखील मी म्हणालो होतो की, ज्या माणसाने साधी कधी महापालिका पाहिली नाही त्याला थेट मुख्यमंत्रिपद कसे काय देता? मात्र, त्यांनी सांगितल्यानंतर मी पद स्वीकारले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील माझ्यावर विश्वास दाखविला. एका जिद्दीने मी काम सुरू केले. मात्र, लगेचच ‘कोरोना’ आला. ज्या माणसाला कधीच प्रशासनाचा अनुभव नव्हता त्याच्यासमोर हे आव्हान उभे राहिले. पण, सर्वांच्या मदतीने त्यावरही मात केली. देशातील पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव आले. मी भेटत नाही, असे सांगण्यात येते. कोरोनानंतर माझ्या पाठीची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचे दोन तीन महिने अतिशय कठीण गेले. या काळात मी कोणाला भेटलो नाही हे खरे आहे. पण, आता मी भेटायला सुरवात केली होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

याच शिवसेनेने तुम्हाला पदे दिली

आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे म्हटले जाते. पण बाळासाहेब 2012 मध्ये गेले. 2014 मध्ये शिवसेना एकट्याच्या बळावर लढली. 63 आमदार निवडून आले. त्यानंतर त्यातील काहींना मंत्रिपदे मिळाली. आतादेखील अडीच वर्षे झाली; काहींना पदे मिळाली. मग ही पदे बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मिळाली ना? असा सवालही उद्धव यांनी केला.

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी ’वर्षा’ बंगला सोडला

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ’वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम ’वर्षा’वरून मातोश्री निवासस्थानी हलवला. तेथे शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा