दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा
पुणे : साधु संत येती घरा,
तोचि दिवाळी दसरा !!
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनाला लाखो भक्तांचा महासागर पहाटेपासूनच शहराच्या विविध भागांतून नाना पेठ व भवानी पेठेत दाखल झाला होता. पावसाची पर्वा न करता लांबच लांब रांगेत थांबून पालख्यांतील पादुकांचे मनोभावे दर्शन घेताच कृतकृत्य झाल्याचे भाव भक्तांच्या चेहर्‍यांवर जाणवत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी तसेच सायंकाळी आलेल्या पावसामुळे वारकर्‍यांची तसेच दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गुरूवारी धावपळ झाली.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लहान-थोर रांगेत उभे होते. ठिकठिकाणी वारकर्‍यांच्या मुखातून घुमणार्‍या ‘माऊली’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. त्यात दर्शनासाठी आलेले भाविकही मनोभावे ज्ञानोबा-तुकोबांच्या नावाचे मनन करीत होते. त्यामुळे परिसरातील भक्तिमय वातावरण शिगेला पोहचले होते. डोक्यावर टोपी आणि कपाळी टिळा लावून तरुणाईही परिसरात मोठ्या संख्येने वावरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या बुधवारी सायंकाळी उशिरा शहरात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांसोबत लाखो वारकर्‍यांच्या आगमनामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण होते. शहरातील भवानी पेठ याठिकाणी संत ज्ञानेश्वरांची तर नाना पेठेमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी होती. दोन्ही पालख्यांसोबत शहरात शेकडो दिंड्या दाखल झाल्या असून त्यात लाखो वारकर्‍यांचा समावेश आहे. शहरातील विविध ठिकाणी दिंड्या उतरल्या आहेत. दिंड्यांमध्ये आलेल्या वारकर्‍यांकडून दिवसभर कीर्तन, भजन, हरिपाठाचे मनन करण्यात येत होते. दरम्यान, नाना पेठ, भवानी पेठ येथे मुक्कामी असलेल्या वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी चहा, फराळाची सोय करण्यात आली होती. तर मोफत चपला शिवून देणे, जेवण, रेनकोट वाटप असे उपक्रम विविध संस्था, मंडळांकडून सुरू होते.
मुक्कामी असणार्‍या पालख्या आणि वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात सीसीटिव्हीद्वारे हालचालीवर करडी नजर ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी थांबून पोलिस ठेहळणी करीत होते. दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना पोलिस मार्गदर्शन करीत होते. तसेच खबरदारी घेण्यासाठी वेळोवेळी सूचनाही करीत होते. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांकडून वारकर्‍यांना आरोग्य सेवा पुरविल्या जात होत्या. रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दर्शनाच्या रांगेला शिस्त लावण्यासाठी पोलिस खडा पहारा देत होते. नाना पेठ तसेच भवानी पेठेत राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळांकडून वारकर्‍यांचे स्वागत करणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा