एलएचबी डब्यामुळे डेक्कन क्विनचे बदलले रूप
पुणे : पुणे-मुंबई प्रवास करणार्या प्रवाशांची लाडकी डेक्कन क्विन नव्या रूपात धावली. दख्खनच्या राणीच्या डब्यात तब्बल 57 वर्षानी बदल झाला. या गाडीला एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. गाडीच्या नव्या रूपाची प्रवाशांना गुरूवारी अक्षरश: भुरळ पडली. त्यामुळे कालचा डेक्कन क्विनचा प्रवास प्रवाशांसाठी सुखावह ठरला.
बुधवारी मुंबईहून पुण्यात येताना डेक्कन क्विनला एलएचबी रेक जोडण्यात आला. रेल्वेत तसेच प्रवाशांच्या मनातही डेक्कन क्विनचे विशेष स्थान आहे. वर्षानुवर्षे या गाडीतून प्रवास करणार्या प्रवाशांचे या गाडीशी ऋणानुबंध जुळले आहेत. ही गाडी म्हणजे एका अर्थाने प्रवाशांचे कुटुंब आहे. त्यामुळेच घरातल्या सदस्यांप्रमाणे या गाडीचा वाढदिवस साजरा केला जातो. रेल्वेचा वाढदिवस साजरा होणारी डेक्कन क्विन ही देशातील एकमेव गाडी आहे. या गाडीचे रूप बदलले असल्याने नव्या रूपात प्रवास करताना प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत. गुरूवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकातून ही गाडी मुंबईकडे रवाना होताना गाडीची तसेच गाडी चालकांचा रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी स्वागत केले.
1 जून 1930 रोजी डेक्कन क्विनचा प्रवासी वाहतूकीचा प्रवास सुरू झाला. प्रारंभीच्या काळात या गाडीत केवळ दोनच श्रेणी होत्या. प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे मिळून सात डबे होते. 1955 मध्ये तृतीय म्हणजे आजचा जनरल क्लास सुरू झाला. 1966 मध्ये आयसीएफ कोच जोडण्यात आले. त्या वेळी डब्यांची संख्या सातवरून 12 करण्यात आली. 15 ऑगस्ट 2021 रोजी या गाडीला विस्टाडोम डबा जोडण्यात आला असल्याने या गाडीच्या वैभवात भर पडली आहे.
