मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून मांडलेल्या भूमिकेला बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याने अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाण्याची जी भूमिका मांडली होती, त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर हाच मुद्दा उचलून धरताना एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी पुन्हा उचलून धरली आहे.

शिंदे यांनी याबाबत ट्विट केले आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक फक्त भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा