बंडखोर आमदारांना शिवसेनेचा व्हीप

शिंदे गटाकडून नवीन प्रतोदाची नियुक्ती

उपाध्यक्षांची भूमिका निर्णायक

मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार गळाला लावण्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना यश आले असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हार न मानता शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करण्याची तयारी केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेना आमदारांना बैठकीला हजर राहणे अत्यावश्यक असल्याचा व्हीप जारी केला. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 34 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रदेखील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठविले असून, नवीन प्रतोदाला मान्यता देण्याची विनंती केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. या बंडाने आता कायदेशीर लढाईचे स्वरूप घेतले आहे. कोणाचा विधिमंडळ पक्ष खरा हे आता सिद्ध करावे लागणार आहे.

बुधवारी सकाळी सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ’वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी होणार्‍या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचा व्हीप काढला. त्यावर, एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिले. यात भरत गोगावले यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शिंदे समर्थक आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेल्या पत्रात ठाकरे सरकार भ्रष्टाचारी असून, गेल्या अडीच वर्षांत केवळ सत्तेसाठी पक्षनेतृत्वाने विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांशी हातमिळवणी केली. याचा परिणाम म्हणून आम्हाला वाईट वागणुकीचा सामना करावा लागला, असा दावा केला आहे.

शिवसेना नेतृत्वाने निवडणूकपूर्व युतीऐवजी विरोधी विचारसरणी असणार्‍या पक्षांसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. केवळ सत्तेसाठी ने़तृत्वाने हा निर्णय घेतला. यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.

तत्कालीन, गृहमंत्री पोलिस खात्यांतील बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत. मंत्री नवाब मलिक हेदेखील दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांच्या आरोपांवरून तुरुंंगात आहेत. यावरून आम्हाला मोठा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी या पत्रात नमूद केले आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या व्हीपचे पालन न केल्यास अपात्र ठरण्याची भीती असते. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून सर्व आमदारांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. स्वाभाविकच गुवाहाटीला असलेले बंडखोर आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ नये, यासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधीच शिंदे समर्थक आमदारांनी नवीन प्रतोदाची नियुक्ती केल्याचे पत्र उपाध्यक्षांना पाठवले आहे. उपाध्यक्ष हे पत्र ग्राह्य धरणार की नाही? ही बाब महत्त्वाची असून, सत्तासंघर्ष आता न्यायालयापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा