उद्धव ठाकरे-शरद पवार भेट

मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेले महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पवार यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. ही बैठक एक तासाहून अधिक काळ सुरू होती. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बंडखोर आमदारांनी स्पष्ट भूमिका घेऊन राज्यपालांना पत्र देईपर्यंत थांबावे. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची रणनीती निश्चित करण्यात आल्याचे समजते.

शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता

सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले होते. परंतु, अशी कोणतीही सूचना पवार यांनी केलेली नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सरकार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा