मनगटावर बांधता येणार; दहा सेकंदाला माहिती संकलित

लंडन : कोरोना होण्यापूर्वीच त्याची लक्षणे सांगणारे आणि त्याची पूर्वकल्पना देणारे यंत्र शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. ते मनगटावर बांधता येते. त्याद्वारे कोरोनाची पूर्वकल्पना मिळते, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षात कोरोना संक्रमणामुळे जग वेठीला धरले होते. लाखो लोकांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे विविध व्हेरियंटनी लोकांची झोप उडविली होती. दक्षता हाच उपाय, तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. पण, कोरोना होणार असल्याची कल्पना देणारी यंत्रणा अस्तित्वात नव्हती. पण, आता मनगटावर बांधता येणारे छोटे यंत्र शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. त्याद्वारे शरीराचे तपमान, हृदयाचे ठोके आणि श्‍वासाची गती यावर लक्ष ठेवता येते. विशेष म्हणजे या यंत्राचा वापर नागरिकांकडून सुरू झाला आहे.

बीएमजे जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एक नवी माहिती उघड झाली आहे. त्यात म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून या यंत्राची निर्मिती केली आहे. हे यंत्र कोरोना होण्यापूर्वी त्याची लक्षणांचा तपशील देते. रिश्‍च वैद्यकीय प्रयोगशाळेच्या संशोधकांनी यंत्रावर केलेला अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यांनी श्‍वासाची गती, हृदयाचे ठोके, त्यातील बदल, तपमान, रक्‍तप्रवाहाचा वेग, झोप यावर यंत्राच्या माध्यमातून संशोधन केले.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कित्येक दिवसानंतर तो झाला, असे समजते. त्या काळात तो अनेकांना संसर्ग करू शकतो. पण, आजार झाल्याची माहिती अगोदरच उपलब्ध झाली, तर अनेकांना संसर्गापासून वाचता येईल, असा दावा करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी 51 वर्षांपेक्षा कमी असलेल्या एक हजार 163 रुग्णांचा अभ्यास केला. हा अभ्यास मार्च 2020 आणि एप्रिल 2021 दरम्यान करण्यात आला. त्याद्वारे हृदयविकाराच्या रुग्णांचा शोध घेणे शक्य झाले. हे यंत्र प्रत्येक 10 सेकंदात आरोग्यविषयक तपशील गोळा करते. त्याची इत्थंभूत माहिती संकलित करून ठेवते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा