इंदूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार कोसळू शकते, अशी स्थिती आहे. असे असताना मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी एक विधान केले. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे, असे त्यांनी म्हटले.

उमा भारती यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. टीका करताना त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे सडकं फळ आहे, ते पडायलाच हवं. महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीने स्थापन झाले आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे ते सरकार हे सडकं फळ आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच त्यांचा एकमेव हेतू होता, असेही त्या म्हणाल्या.

”महाविकास आघाडीमधील शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नाहीये, ती काँग्रेसची बी टीम असलेली शिवसेना आहे. त्यामुळे हे सरकार पडायलाच हवं, कारण ते हिंदुविरोधी आणि महिलाविरोधी सरकार आहे. शिवसेनेने आपले नाव बदलून ‘काँग्रेस सेना’ ठेवावे,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

खरंतर, २० जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३० हून अधिक आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते गुजरातमधील सुरत याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. पण बुधवारी मध्यरात्री ते सर्व आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे पेच वाढला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा