मुंबई : महाराष्ट्रात वारंवार महाविकास आघाडी विषयी आणि त्यातील नेत्यांविषयी सातत्याने चर्चा आणि घडामोडी सुरु असतात. यावर हल्ली बर्यापैकी बॉलिवूड अभिनेते, मराठी कलाकार व्यक्त होताना दिसतात. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरु आहे त्यावरूनही काही अभिनेत्यांनी ट्विट करत आपली मते व्यक्त केली आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, सुमित राघवन, हेमंत ढोमे, प्राजक्ता माळी, किरण माने, क्षितीश दाते, दीपाली सय्यद, हेमंत ढोमे, आरोह वेलणकर यांचा समावेश आहे.

अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? : सुमित राघवन

सुमीत राघवनने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीतने एका वृत्तपत्रिकेतील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करताना सुमीत म्हणाला, एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?

सुमीतची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

“काय मूर्खपणा चालला आहे! : स्वरा भास्कर

स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”, असे कॅप्शन दिले आहे. स्वराने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. स्वराही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच स्वरा भारतात आणि विदेशात होणाऱ्या घडामोडींवर तिची प्रतिक्रिया देत असते.

“विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?” : दीपाली सय्यद

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी, भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू”, असे दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘हीच का हिंदुत्वासाठीची लढाई?’ : महेश टिळेकर

लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एक पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. एकनाथ यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला. आणि आता या गटाला भाजप कडून मोठी ऑफर देण्यात येत आहे अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर येत आहेत. ही गोष्ट लक्षात आणून देत टिळेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शिंदे यांना खोचक प्रश्न विचारला. एका वाहिनीवर शिंदे यांना भाजपकडून २ केंद्रीय मंत्रिपदं, राज्यात ५ मंत्रिपदं आणि ८ कॅबिनेट मंत्रिपदं देण्याची ऑफर देण्यात आल्याचा फोटो शेअर करत टिळेकर यांनी प्रश्न विचारत लिहिलं, ‘हीच का हिंदुत्वासाठीची लढाई?’ टिळेकर यांच्या पोस्टवर अनेकांनी त्यांना दुजोरा दिला आहे.टिळेकर यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, ‘लढाई हिंदुत्वासाठी कधी होती?’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘गुजरातच्या दावणीला बांधलेलं हिंदुत्व आहे हे, भाजपमध्येही प्रवेश करतील हे.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘१३ मंत्रिपदं आता त्यावरून गुवाहाटीमध्ये हाणामारी लागू नये म्हणजे मिळवलं.’

भूमिकेतील छायाचित्राचा गैरवापर : क्षितीश दाते

‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता क्षितीश दाते याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीक्षचा ‘धर्मवीर’मधील लूक पाहायला मिळत आहे. तसेच ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं या फोटोबरोबर लिहिलेलं दिसत आहे.हा फोटो शेअर करत क्षितीशने म्हटलं आहे की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.” एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिशने उत्तमरित्या साकारली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा