स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर, उपग्रहही पाठविला

सेऊल : दक्षिण कोरियाने मंगळवारी स्वदेशी बनावटीच्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले असून उपग्रहाची प्रतिकृती देखील पाठविली आहे. त्यामुळे अवकाश कवेत घेण्याचे दक्षिण कोरियाचे स्वप्न पूर्ण होण्यास चालना मिळाली. तसेच अवकाशातून शत्रूवर विशेषत: उत्तर कोरियावर भविष्यात लक्ष ठेवण्यास मोठी मदत मिळणार आहे.

नुरी असे रॉकेटचे नाव आहे. या रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात 700 किलोमीटरवर एका उपग्रहाची प्रतिकृती प्रक्षेपित करण्यात यश मिळाले आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता हे रॉकेट अवकाशात धुराच्या लोटात झेपावले. प्रक्षेपण यशस्वी झाल्याची माहिती विज्ञान मंत्री लि जोंग हो यांनी दिली. ते म्हणाले, कोरियाचे अवकाश रॉकेटच्या चाचणीमुळे अधिक खुले झाले आहे. हे मोठे यश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात देशाने टाकलेले मोठे पाऊल आहे. जनतेच्या सहकार्याने सरकार देशाला अवकाश शक्‍ती नक्‍कीच बनवू. अध्यक्ष योन सुक येओल यांनी रॉकेट प्रक्षेपण यशस्वीरीत्या केल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, या प्रक्षेपणामुळे दक्षिण कोरिया हा अवकाश संशोधनात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारा जगातील दहावा देश बनला आहे. अशा प्रकारच्या आणखी चार रॉकेटचे प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच चंद्रावर देखील यान उतरविण्याचे स्वप्न आहे. तसेच भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी उपग्रह आकाशात पाठविण्याची योजना आखली आहे. सध्या तरी या रॉकेटचा वापर हा प्रामुख्याने उपग्रह, याने पाठविण्यासाठी केला जाणार असून त्याचा लष्करासाठी वापर करण्याची योजना नसल्याचे अध्यक्ष येओल यांनी स्पष्ट केले.

रॉकेटचे नाव : नुरी
लांबी : 47 मीटर असून त्यावर कोरियाचे नाव आणि ध्वज
वजन : 200 टन
क्रमांक : स्वदेशी बनावटीचे रॉकेट बनविणारा दहावा देश
कितवा प्रयत्न : दुसरा
प्रक्षेपण क्षमता : 700 किलोमीटर
उपग्रहाचे वजन : 1.3 टन

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा