पुणे : सदा माझे डाळे जडोतुझे मूर्ती!
रखुमाईच्या पती सोयरिया !!1!!
गोड तुझे रूप गोड तुझे नाम!
देई मन प्रेम सर्व काळ !!
ज्ञानोबा-तुकोबाचा अखंड गजर… कपाळी टिळा… गळा तुळशी माळ… डोक्यावर तुळशी वृंदावन… हवेत फडफडणार्‍या भगव्या पताका, रांगोळ्यांच्या पायघड्या… आसंमतभर घुमणारा टाळ-मृदंगांचा नाद… अशा भक्तीमय वातावरणात दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यनगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे बुधवारी आगमन झाले. वैष्णवांचा महासागर आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजराने शहर दुमदुमले. यावेळी पालखी सोहळ्याती वारकर्‍यांची संख्याही वाढली आहे.
पालख्यांच्या आगमनाआधी पुणेकरांनी पालखी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. पालख्यांच्या दर्शनाची पुणेकरांना आस लागली होती. सजविलेल्या पालख्या डोळ्यात साठविण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. पालख्यांच्या आधी शहरात प्रवेश करणार्‍या वारकर्‍यांची पुणेकरांनी मनोभावे सेवा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येत प्रकर्षाने वारकर्‍यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. पालख्यांचे आगमन होताच पुणेकरांनी पुष्पवृष्टी करीत मोठ्या भक्तिभावाने पालख्यांचे स्वागत केले.
शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दोन्ही पालख्यांना वरुणराजा जलाभिषेक घालणार असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात पावसाने हजेरी लावली नाही. तुकोबांची पालखी पिंपरीहून, तर माऊलींची पालखी आळंदीतील गांधी वाड्यातून मार्गस्थ झाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या घणघणाटासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. हजारोंच्या संख्येने भक्तगण पाचच्या सुमारास पाटील इस्टेट चौकात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडू लागला. पाठोपाठ अश्व आले. भक्तांनी अश्वांचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळी 5.35 वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टिपथात पडला. रथातील तुकोबांची पालखी आणि त्यातील पादुका डोळ्यांना दिसल्या आणि भाविक कृतकृत्य झाले. काहींना पादुका दर्शनाचे भाग्य लाभले. तुकोबांच्या आगमनानंतर माउलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना दोन तास वाट पाहावी लागली. सायंकाळी 7.30 वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माउली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माउलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली. काहींना केवळ नेत्राद्वारे पादुकांचे दर्शन झाले. मात्र, सर्वांनीच धन्यत्वाचा अनुभव घेतला. वारकर्‍यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्त्यामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक येथे विसावला. तेथे ग्यानबा-तुकारामचा एकच गजर झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करणारे फ्लेक्स व बॅनर लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयातर्फे वारकर्‍यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकातही पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. सबंध पालखी मार्गावर पुणेकर वारकर्‍यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे; तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे रात्री उशिरा विसावली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा