पुणे : महापालिकेच्या ७० उद्यानांची नावे बदलण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेच्या 24 जुलै 2000 च्या ठरावाला डावलून उद्यानांना नावे देण्यात आली आहेत, असा अभिप्राय महापालिकेच्या विधी विभागाने दिला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सॅलसबरी पार्क येथील उद्यानाला देण्यात आलेल्या नावावर येथील नागरिकांनी यावर आपेक्ष घेतला. यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे शहरातील उद्यानांना महापालिकेच्या ठरावाप्रमाणे नावे देण्यात आली आहेत का? याबाबत शोध सुरु करण्यात आला आहे. महापालिका 2000 साली शहरातील उद्यानांना राष्ट्रीय नेते आणि वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींची नावे देण्यात यावीत, असा ठराव करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने विधी विभागाकडून अभिप्राय मागवला होता. यामध्ये महापालिका ठराव क्रमांक 110, दि. 24 जुलै 2000 नुसार शहरातील उद्यानांना नावे देण्यात यावीत असा ठराव आहे. मात्र महापालिकेच्या 70 पेक्षा जास्त उद्यानांना राष्ट्रीय नेते आणि पर्यावरण तज्ज्ञ व वनस्पती शास्त्रज्ञ यांच्या नावाशिवाय नावे देण्यात आली आहे. ही मुळ ठरावाच्या विरुध्द नावे आहेत. उद्यान विभागाने ही बाब मुख्य सभेच्या निदर्शनास आणून सुध्दा अन्य नावाचे ठराव करण्यात आले असल्याचे विधी विभागाच्या अभिप्रायात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या 70 पेक्षा जास्त उद्यानांना नगरसेवकांचे नातेवाईकांची नावे देण्यात आली असल्याचे वृत्त ‘केसरी’ने सर्वप्रथम दिले होते. आता विधी विभागाकडून सुध्दा ही नावे मुळ ठरावाच्या विसंगत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्यानांची नावे बदलण्याची वेळ महापालिका प्रशासनावर येवू शकते.

महापालिकेच्या विधी विभागाच्या अभिप्रायामध्ये शहरातील 70 पेक्षा जास्त उद्यानांना देण्यात आलेली नावे ही नियमानुसार नाहीत हे अभिप्रायातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही आक्षेप घेतलेला फलक प्रशासनाने काढला पाहिजे.

  • विनिती देशमुख, सॅलसबरी पार्क रेसिडन्स फोरम

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा