मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक असणार्‍या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा आयपीएलच्या मागील पर्वापासून संघासोबत होता. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये मुंबईने 30 लाख रुपयांना अर्जूनला विकत घेतले होतेे. मात्र दोन्ही पर्वांमध्ये अर्जूनला प्रत्यक्षात एकाही सामन्यामध्ये संघात स्थान देण्यात आले नाही. याचसंदर्भात सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली.

अर्जूनला संधी देण्यात आली नाही याबद्दल विचारले असताना सचिनने आधी तर हा प्रश्न फार वेगळा असल्याचे मत नोंदवले. हा फार वेगळा प्रश्न आहे. मला याबद्दल काय वाटते किंवा मी काय विचार करतो हे फार महत्वाचे नाही. यंदाचे पर्व संपले आहे, असे सचिन म्हणाला.‘सचिनसाईट’ नावाच्या कार्यक्रमामध्ये त्याला अर्जूनला आयपीएलमध्ये खेळताना पहायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरच उत्तर देताना त्याने हे भाष्य केले.

मुंबईच्या संघाचा सल्लागार असणार्‍या सचिनने अंतिम संघात खेळाडू निवडण्याच्या बाबतीत दखल देत नसल्याचे स्पष्ट केले. आपण तो निर्णय संघ व्यवस्थापनाला घेऊ देतो, असे सचिन म्हणाला. जर निवड करण्याबद्दल बोलायचे झाले तर मी त्यात कधीच पडत नाही. मी सर्व गोष्टी या संघ व्यवस्थापनावर सोडतो. कारण मी कायमच अशापद्धतीने काम करत आलो आहे, असे सचिन म्हणाला.

अर्जूनसोबत होणार्‍या चर्चेबद्दलही सचिनने या मुलाखतीत माहिती दिली. मी जेव्हा अर्जूनबरोबर चर्चा करतो तेव्हा त्याला सांगतो की मार्ग खडतर आहे. हे फार कठीण असणार आहे याची जाणीव करुन देतो. तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण तुला तो खेळ आवडतो. तू तेच करत राहा. तू कष्ट घे चांगली फळं मिळत जातील, असं सचिन मुलासोबतच्या संवादाबद्दल बोलताना म्हणाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा