गुवाहाटी : आसाममध्ये पुराचे तांडव सुरूच आहे. सोमवारी 11 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 80 वर पोचली असून 47 लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी अधिकार्यांशी पूरस्थितीबाबत चर्चा केली.
राज्यातील 36 पैकी 32 जिल्ह्यात पुराचे तांडव सुरू आहे. मृतांची संख्या गेल्या वर्षीच्या पुरातील संख्येपेक्षा अधिक झाली आहे. पुरापाठोपाठ दरडी कोसळल्याने मृतांची संख्या वाढली. या पुरात दोन पोलिस कर्मचारीदेखील वाहून गेले होते. अनेक जण पुरात बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पुराची भीषणता वाढली आहे.
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्राने पावले उचलली असून शाह आणि बिस्वास यांनी याबाबत चर्चा करून मदतकार्य करणार्या अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.