पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिके केली. तसेच योगाचे महत्त्व तज्ज्ञांनी पटवून दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये प्रा.डॉ संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू यांचे अध्यक्षतेखाली व विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. विजय खरे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता व क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक व विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपक माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते.

8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत योग जनजागरण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभागातील एम.ए. योगा, एम.पी.एड., योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जवळच्या शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत केंद्र, रहिवासी सोसायटीमध्ये दररोज 1 तासाचे योगाचे प्रशिक्षण दिले व त्याद्वारे समाजामध्ये योगाबद्दल जनजागृती करण्याचे काम केले.

अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अष्टांग आयुर्वेदच्या नूतन कुलकर्णी यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदकुमार बंगाळे यांनी केले.

साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ पुणे यांनी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष योगावर्गाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय योगपटू सिद्धेश विठ्ठल कडू या बालयोग्याने अनेक आसनांचे याप्रसंगी सादरीकरण केले. विशेषतः त्याने झाडाला घातलेल्या चक्रासनाने सर्वांचेच डोळे दिपून गेले.

मन:शांती, शारीरिक स्वास्थ्य आणि कामातील उत्साह मिळविण्यासाठी योगाच्या रुपाने भारताने जगाला ’सॉफ्ट पॉवर’ची भेट दिली असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. या कार्यक्रमात 100 कर्मचारी सहभागी झाले होते. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापकीय संचालक गगन मलिक, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. संदीप बुटाला. पतंजली योग संस्थेचे अंकुश नवले उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध घटक संस्थांमध्ये जागतिक योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायामाची प्रात्यक्षिके, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. नवीन मराठी शाळेत मनाचे आणि शरीराचे आरोग्य जपण्यासाठी योगासने करा, असे आवाहन मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी केले. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात आली. डीईएस प्रायमरी, सेकंडरी आणि एनईएमएस स्कूलमध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ’ब्रेन योगा’ सादर करण्यात आला. योगगुरू संगीता मणियार यांनी योगासने करून घेतली. आयुष मांडवे या विद्यार्थ्याने ’लिफ आर्ट’ झाडांच्या पानावर योगासनाच्या प्रात्यक्षिकांची चित्रे साकारली. रानडे बालक मंदिरात योगशिक्षिका शिल्पा पराडकर यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, उत्कटासन, भुजंगासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन ही आसने करून घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा