कोलंबो : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाने 5 कोटी डॉलरची तातडीची मदत जाहीर केली आहे. त्या मदतीतून अन्‍न आणि औषध खरेदीचा खर्च भागविला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ओ नील यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे आणि पंतप्रधान रेनील विक्रमसिंघे यांची भेट घेतली. तेव्हा या मदतीची घोषणा करण्यात आली.

संयुक्‍त राष्ट्रांच्या जागतिक अन्‍न योजनेअंतर्गत तातडीने 2 कोटी 20 लाख डॉलरची मदत देत असल्याचे नील यांनी सांगितले. त्याद्वारे 30 लाख नागरिकांना अन्‍नपुरवठा करता येणार आहे. तसेच
जीवनावश्यक पोषक खाद्यपदार्थ देण्यास मदत होईल. त्या व्यतिरिक्‍त 2 कोटी 30 लाख डॉलर विकासकामांसाठी दिले जाणार आहेत.

महिला, मुली यांना आरोग्य सेवा देण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी या मदतीचा मोठा उपयोग होणार आहे. ही 5 कोटी डॉलरची मदत संयुक्‍त राष्ट्रांकडे दिल्याचे ते म्हणाले. या मदतीबद्दल आस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांची भागिदारी अनेक वर्षांपासून आहे. अनेकदा आम्ही श्रींलंकेच्या नागरिकांना मदत केली आहे.

दरम्यान, 2 कोटी 20 लाख लोकसंख्या असलेले श्रीलंका आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या 70 वर्षात प्रथमच हे संकट कोसळले. अन्‍न, इंधनाची टंचाई असून महागाईने कळस गाठला आहे. तसेच औषधांची तीव्र टंचाई आहे. परकीय कर्जामुळे व जनतेवरील कर कमी केल्याचे हे दुष्परिणाम श्रीलंकेला भोगावे लागत आहेत. परकीय कर्जाबाहेर पडण्यासाठी श्रीलंकेला 50 अब्ज डॉलरची गरज असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि विविध देशांकडे मदत मागितली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा