बख्तर : अफगाणिस्तानातील बऱ्याच भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपात २८० लोकांचा मृत्यू झाला असून ६०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे. भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की अफगाणिस्तान बरोबर पाकिस्तान आणि भारतातील काही भागांनाही हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.

६.१ रिश्टर स्केलचा धक्का

६.१ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच भुकंपाचे धक्के जाणवलेल्या भागात मदतीसाठी आपातकालीन संस्थांना आवाहनही करण्यात आले आहे. दक्षिणपूर्व अफगाणिस्तानच्या खोत शहरापासून ४४ किलोमीटर दूर या भूकंपाचा केंद्रबिदू असल्याची माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे.

भारत आणि पाकिस्तानलाही जाणवले धक्के

या भूकंपाचा प्रभाव ५०० किमीच्या परिघात होता त्यामुळे अफगाणिस्तानसोबत पाकिस्तान आणि भारतालाही भूकंपाचे धक्के जाणल्याची माहिती युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने दिली. पाकिस्तानी माध्यमांच्या अहवाला नुसार, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतान शहरांनाही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.

अफगाणिस्तानमधील बर्मल, झिरुक, नाका आणि ग्यान जिल्ह्यांना भुकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भागातील मृतांची संख्या ९२० वर पोहचली असून ६०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत असून हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा