विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरु असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी आता पक्षीय राजकारणाला सोडून राष्ट्रीय स्तरावर व्यापक विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे केले होते. त्यानंतर आता सिन्हा यांनी सूचक ट्विट केल्यानंतर तेच विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

“तृणमूल काँग्रेस पक्षात जो सन्मान आणि प्रतिष्ठी भेटली त्याबद्दल मी ममता बॅनर्जी यांचे आभार मानतो. एका मोठ्या राष्ट्रीय कारणासाठी तसेच विरोधकांच्या ऐक्यासाठी मला पक्षाला बाजूला ठेवावे लागणार आहे. ममता बॅनर्जी माझा हा निर्णय मान्य करतील याची मला खात्री आहे,” असे ट्वीट यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

याआधी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षाकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र गोपाळकृष्ण गांधी यांनी एक निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला. देशभरातून ज्याला सर्वसहमती असेल अशाच व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असे गांधी म्हणाले होते. “काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देण्याचा विचार केला जातोय. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मात्र राष्ट्रपतीपदाचा उमेदवार राष्ट्रीय पातळीवर सर्वसहमती निर्माण करणार असावा. माझ्यापेक्षा दुसरा एखादा व्यक्ती हे प्रभावीपणे करु शकेल असे मला वाटते. त्यामुळे अशाच एखाद्या व्यक्तीला ती संधी द्यावी, अशी विनंती मी या नेत्यांना करतो,” असे गोपाळकृष्ण गांधी आपल्या निवेदनात म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा