पुणे : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज (मंगळवार) पासून येत्या गुरूवारपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, कोकणात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोसाट्याच्या वार्‍यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील 24 तासात कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला.

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनने राज्यातून पुढे वाटचाल सुरू केली आहे. आज (मंगळवार) पासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील घाटमाथा परिसरातही पावसाचा सुरूवात झाली आहे. तसेच राज्यातील धरण क्षेत्रातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने मान्सूनच्या आगमनानंतर मोठ्या पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

विजांच्या कडकडाटात पाऊस

नाशिक, औरंगाबाद, नगर, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जालना आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात मुसळधार

दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी शहरात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज (मंगळवार) पासून येत्या शनिवारपर्यंत शहरात रोजच वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात काल 34.2 अंश कमाल, तर 23.4 अंश किमान तपमानाची नोंद झाली. शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा