‘हॉकफोर्स’च्या जवानांना यश

गोंदिया : बालाघाट जिल्ह्यात आज, सोमवारी पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात लाखो रुपयांचे बक्षिसे असलेल्या तीन नक्षलवाद्यांचा ‘हॉकफोर्स’च्या जवानांनी खात्मा केला. चकमकीत आणखी काही नक्षली मारले गेल्याचे समजते, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

बालाघाट जिल्ह्यातील कदला गावाच्या जंगलात नक्षलवाद्यांची बैठक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ‘हॉकफोर्स’चे पथक नक्षल्यांच्या शोधात तेथे पोहोचले. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला हॉकफोर्स जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. यात नागेश ऊर्फ राजू (३८, गडचिरोली), मनोज (३८) आणि रामे या लाखोंचे बक्षीस असलेल्या नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

या बैठकीत जवळपास ५० नक्षलवादी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चकमकस्थळावरून दोन एसएसएलआर रायफल, सिंगल शॉट रायफल्स, इतर शस्त्रे आणि साहित्य जप्त केले. चकमकीनंतर नक्षलवादी शेजारील महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील दंडकारण्यात पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.

या यशाबद्दल गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, पोलीस महानिरीक्षक संजय कुमार, पोलीस अधीक्षक समीर सौरभ, हॉकफोर्स कमांडंट आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांचे कौतुक केले. या घटनेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीच्या माध्यमातून नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा