भारत-इंग्लंड कसोटी

बर्मिंगहॅम : येथे 1 जुलैपासून खेळल्या जाणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीसाठी भारतीय संघाची सलामीची जोडी निश्चित करण्यात आली आहे. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मासोबत कोण डावाची सुरुवात करणार याची जोरदार चर्चा सुरु होती. पण, आता कर्णधार रोहितसोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करील हे निश्चित झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी राहुलला दुखापत झाली होती. मात्र, त्यांच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही.

भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम पेजवर रोहित आणि शुभमन गिलचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ओपनर्स नेट सत्राच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना, असे लिहिले आहे.

5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 5 वा सामना कोविड-19 मुळे पुन्हा नियोजित करण्यात आला आहे. सध्या भारत 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून, त्यांना मालिका जिंकण्याची संधी आहे. याशिवाय 5 व्या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधारही बदलले आहेत. इंग्लंडचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे आहे, तर भारताची कमान रोहित शर्माकडे आहे.

1 जुलैपासून सुरू होणार्‍या कसोटीपूर्वी भारत 24 जून ते 27 जून दरम्यान लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना ग्रेस रोड लीसेस्टर येथे होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा