आरटीओच्या स्कुल बस चालक व मालकांना सुचना
पुणे : योग्यता प्रमाणपत्र न घेतलेल्या स्कूल बस चालक व मालकांनी गाडीची परिवहन कार्यालयात (आरटीओ) तपासणी करून घ्यावी. शहरातील शाळांनी देखील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बस चालकांची कागदपत्रांची तपासणी करावी, अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी स्कूल बस चालक व शाळा प्रतिनिधींना दिल्या आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे स्कूल बस मालक, चालक आणि शाळा प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, स्कूल बस चालक व मालक, शाळा प्रतिनिधी उपस्थित होते.
शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूकही सुरू झाली आहे. आरटीओकडे नोंदणी असलेल्या 50 टक्के स्कूल बस व व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभुमीवर आरटीओने बैठक घेतली. या बैठकीत योग्यता प्रमाणपत्र न घेतलेल्या स्कूल व्हॅन व बस चालकांनी तत्काळ ते नुतणीकरण करून घ्यावे. स्कूल बस नियमावलीची त्यांना माहिती दिली. तसेच, शाळांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची कागदपत्रे तपासावीत. योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे आढळून आल्यास त्यांना ते घेण्यास सांगावे, अशा सूचना दिल्या. यावेळी स्कूल व्हॅन मालक व चालकांनी त्यांचे प्रश्न बैठकीत मांडले. त्यापैकी आरटीओशी संबंधित प्रश्न तत्काळ सोडविण्यात आले. इतर प्रश्न आरटीओशी निगडीत नसल्यामुळे त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला देण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा