पुणे ः ब्रिटिश अधिकारी रँडच्या वधाला बुधवारी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त इतिहासप्रेमी मंडळातर्फे गणेशखिंड परिसरातील चापेकर बंधूच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी ‘स्वातंत्र्याचा क्रांतिसूर्य’ या महानाट्यात चापेकरांची भूमिका साकारणारे कलाकार भूषण पाठक हे चापेकरांच्या वेशभूषेत उपस्थित असणार आहेत. तसेच, चापेकरांचे वारसदारही उपस्थित असणार आहेत.
इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेट्टे म्हणाले, मंडळातर्फे दरवर्षी गणेशखिंड येथील चापेकरांच्या स्मारकात कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा, तीन दिवसांपूर्वीच ‘स्वातंत्र्याचा क्रांतिसूर्य’ महानाट्य पार पडले. बुधवारी सकाळी आठ वाजता मंडळाचे पदाधिकारी चापेकरांच्या स्मारकात जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. या कार्यक्रमास चापेकर यांच्या वारसदारांनी उपस्थित राहावे, अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे. तसेच ‘स्वातंत्र्याचा क्रांतिसूर्य’ या महानाट्यात पात्र साकारत असलेले कलाकार त्याच वेशभूषेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, गुरूवारी सकाळी 8.30 वाजता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या इमारतीतून रँड बग्गीतून रवाना झाले होते, त्या इमारतीत याच घटनेवर आधारित नाटक साजरे केले जाणार आहे. हा कार्यक्रम इतिहासप्रेमी मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आला आहे.
गणेश मंडळाचे पदाधिकारी
करणार अभिवादन

शहरातील अनेक गणेश मंडळांकडून वर्षभर विधायक उपक्रम राबविले जातात. सामाजिक कार्यात गणेश मंडळाचा वाटा मोठा आहे. बुधवारी रँडच्या वधाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांच्या पुढाकारातून काही गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेशखिंड येथील चापेकर बंधूच्या स्मारकातील चापेकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा