पुणे : ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना मूलभूत सेवा सुविधा देताना आरोग्यविषयक सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 22 जून रोजी पुण्यात येत असून दोन दिवसांच्या मुक्कामानंतर 24 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. यामुळे यंदाच्या वर्षी या सोहळ्यात 14 ते 15 लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 22 ते 24 जून दरम्यान शहरातील व पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यासोबतच पालखी मार्गावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने व्यापक तयारी केली आहे.

पालखी मुक्काम आणि मार्ग परिसरातील सर्व रस्ते, गल्लीबोळे, सार्वजनिक स्वच्छतागृह, कचरा पेट्या, गटारे, ड्रेनेज आदींची स्वच्छता तीन पाळ्यांमध्ये कर्मचार्‍यांकडून केली जाणार आहे. तसेच वारकर्‍यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, निर्जंतुकीकरण, शौचालये आदी सेवा सुविधांची व्यवस्था असेल.

आरोग्य सुविधा

महापालिकेने वारकर्‍यांसाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि मार्गावर 21 ठिकाणी औषधांचे वाटप आणि उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नाना पेठेतील रफी महमंद किडवाई शाळा आणि मामासाहेब बडदे दवाखान्यात वारकर्‍यांसाठी कोरोना लसीकरणाची मोफत सुविधा केली आहे. यासोबतच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू राहणार आहे.

वारकरी महिलांना सॅनेटरी नॅपकिन्स

महापालिकेच्या वतीने महिला वारकर्‍यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या 10 शाळांमध्ये मुक्कामांच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटत केले जाणार असून, पालखी तळ परिसरात सॅनेटरी नॅपकिन व्हेंडींग मशीन्स बसविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर स्त्री रोग तज्ज्ञही नेमण्यात येणार आहेत.

स्वच्छतेवर भर

पालखी मार्गावर पालखी आगमनापूर्वी व पालखी पुढे गेल्यानंतर झीरो गार्बेज संकल्पनेअंतर्गत रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. पालखी दरम्यान ‘प्लास्टिक’चा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सार्वजनिक हौद आणि मोकळ्या जागांची सफाई करण्यात आली असून त्याठिकाणी जंतुनाशक पावडरचा वापर करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा

पालखी सोहळ्यादरम्यान पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहरात पालखीच्या मुक्कामांच्या ठिकाणी तसेच वारीमध्येही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच 28 ठिकाणी तात्पुरते नळजोडही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

पालखी तळावर विशेष सुविधा

नाना पेठेतील पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी पालख्यांचा मुक्काम राहणार आहे. याठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या परिसरात वारकर्‍यांसाठी पाण्याचे टँकरही असतील. तसेच सॅनेटरी नॅपकिन वाटपासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा