मुंबई : शिवसेनेमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे महत्वाचे मंत्री असणारे एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गुजरातमधील सुरत येथे आहेत. त्यांनी बंड केल्याच्या चर्चेला उधाण आले असून, त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप ते घडविणार असल्याची जोरादार चर्चा सुरू आहे. पण, शिवसेनेला बंड नवे नाही. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांनी पहिले बंड केले होते. छगन भुजबळ यांच्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी बंडाचे निशाण फडकविले होते.

छगन भुजबळ : छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष नेत्याचे पद आणि मनोहर जोशी यांच्याबरोबर झालेल्या मतभेदामुळे भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. तसेच ९ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशा केला होता. भुजबळ यांचे बंड हा शिवसेनेला पहिला मोठा धक्‍का होता.

गणेश नाईक : शिवसेनेला दुसरा धक्‍का गणेश नाईक यांच्या रुपाने मिळाला. त्यांना महत्त्वाचे खाते हवे होते; परंतु त्यांची बोळवण पर्यावरणमंत्री पदावर केली. त्यामुळे त्यांनी १९९९ मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नारायण राणे : शिवसेनेला तिसरा झटका हा नारायण राणे याच्यामुळे बसला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला त्यांनी विरोध केला. २००५ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपत प्रवेश केला.

राज ठाकरे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जाणारे राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडली आणि स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यामुळे ठाकरे घराण्यात प्रथमच उभी फूट पडली होती. ते मतभेदामुळे शिवसेनेतून बाहेर पडले होते.

एकनाथ शिंदे : शिवसेनेचा बालेकिल्‍ला असलेल्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड म्हणजे शिवसेनेला मोठा धक्‍का मानला जात आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही मुंबईपेक्षाही अधिक आहे, तसेच एकनाथ शिंदे हे ठाण्याचे शिवसेनेचा चेहरा आहेत. एकनाथ शिंदे हे यापूर्वीही नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यांनी ही वृत्ते फेटाळून लावली होती. सध्या शिवसेनेकडे शिंदे एवढे मोठे दुसरे नाव ठाणे जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे शिंदे यांनीच बंड केल्यास पुढील प्रवास शिवसेनेसाठी फारच खडतर ठरु शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा