मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे सरकार करताना देखील अशी बंडाळी झाली होती. पण नंतर काय झाले, हे संपर्ण देशाने पाहिले. आताही चर्चेतून सगळं काही ठीक होईल, असा विश्वास आहे. पण सध्या शिवसेनेत जे काही चाललंय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असे शरद पवार म्हणाले. त्यावर सरकार कोसळेल का? आणि सरकार पडल्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, आपण भाजपसोबत जाणार का?, असा थेट सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर ‘जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचारा. आम्ही विरोधी पक्षात बसू’, असे थेट उत्तर पवारांनी दिले.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक निकालात सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा जबर धक्का बसला आहे. राज्यसभेत सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मते फुटली तर विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेनेची मते फुटली. विधान परिषदेत सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण एकनाथ शिंदे यांचा गट आधीपासूनच नाराज होता. निकाल लागण्याच्या काही तास अगोदर प्री-प्लॅनिंगनुसार एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही समर्थक आमदारांनी सुरत गाठले. सकाळी ६ वाजण्याच्या सुमरास एकनाथ शिंदेंच्या बंडाचे वृत्त आले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच भूकंपाच्या पार्श्वभू्मीवर शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
ठाकरे सरकार व्यवस्थित चाललंय. पण काही लोकांकडून सरकार पाडण्याचं सातत्याने षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्रात असे तिसऱ्यांदा घडत आहे. पण मला विश्वास आहे. की सगळं काही सुरळित आणि व्यवस्थित होईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
तेवढ्यात भाजपच्या ऑपरेशन लोटससंबंधी प्रश्न विचारताना ठाकरे सरकार पडलं तर आपली भूमिका काय असेल, राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल का? असा थेट प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. पत्रकाराच्या प्रश्नावर पवार काहीसे संतापले. थोडे तरी सेन्सिबल प्रश्न विचारा, असे म्हणत आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असे स्पष्टपणे पवारांनी सांगितले.
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे तुमच्याकडून ऐकतोय. मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंकडे आहे. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, इतर मंत्रालय काँग्रेसकडे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात बदल करण्याची गरज नाही”, शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री कुणाला करायचे हे शिवसेना ठरवेल, असे ही ते म्हणाले.