कर्नाटक क्रिकेट संघटनेचा निर्णय

नवी दिल्ली : बंगळुरूमध्ये खेळलेला शेवटचा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. प्रथम पावसामुळे 1 षटक कापल्याने सामना 50 मिनिटे उशिरा सुरू झाला. निर्णायक सामना पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती; पण तसे झाले नाही आणि केवळ 3.3 षटकांचा सामना खेळवता आला. 19-19 षटकांच्या या सामन्यात खेळ थांबेपर्यंत भारताने 2 गडी गमावून 28 धावा केल्या होत्या; पण पावसामुळे खेळ पुन्हा सुरु होऊ शकला नाही.

सामना रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली; पण कर्नाटक क्रिकेट संघटनेने त्यांची निराशा काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. खरेतर, सामना रद्द झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून तिकिटाच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे तिकिटाचे अर्धे पैसे प्रेक्षकांना परत करण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे. प्रेक्षक त्यांचे तिकीट दाखवून हे पैसे काढू शकतील. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया कर्नाटक क्रिकेट संघटना लवकरच जाहीर करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा