नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार होण्यास गोपालकृष्ण गांधी यांनी सोमवारी नकार दिला. त्यामुळे आता विरोधकांचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार होण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ आता गोपाल कृष्ण गांधी यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची विरोधी पक्षनेत्यांची विनंती नाकारली.

दरम्यान, काही विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार म्हणून सुचवले आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून, 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. याआधीची, राष्ट्रपती पदाची निवडणूक 17 जुलै 2017 रोजी पार पडली होती. तर, 20 जुलै रोजी मतमोजणी झाली होती. कोविंद यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि विरोधी उमेदवार मीरा कुमार यांचा जवळपास 3,34,730 मतांनी पराभव केला होता.

अभिषेक बॅनर्जी बैठकीस उपस्थित राहणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवारी) विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस पश्‍चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, त्यांच्याऐवजी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा