मुंबई : एकनाथ शिंदे या नावाने आज महाराष्ट्राचे राजकारण ढवळले आहे. एक एक पक्ष एकत्र येऊन झालेली महाविकास आघाडी आज या एका नावाने कोलमडण्याच्या बेतात आहे. एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने आमदारांची तातडीची बैठक बोलावली, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सर्व आमदारांना बोलावले आहे. दुसरीकडे तिसरा सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणणारे एकनाथ शिंदे कोण आहेत यांच्याविषयी जाणून घेऊ.

कट्टर शिवसैनिक

एकनाथ शिंदे हे ठाकरे घराण्यानंतर सर्वात शक्तिशाली शिवसैनिक असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज एकनाथ शिंदे त्याच खुर्चीत असते, अशीही चर्चा होती. ५९ वर्षांचे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत. १९८० मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. पक्षासाठी ते तुरुंगातही गेले आहेत. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात गेल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे ११ वीपर्यंत शिक्षण घेतले. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की, लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. २०१४ मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये PWD चे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती तर २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण (महाराष्ट्र सरकार) कॅबिनेट मंत्री पद मिळाले.

२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता होता राहिले.

ठाण्यात शिंदे-भाजप-संघ मैत्री

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरांमधील भाजप नेते तसेच संघाशी संबंधित वर्तुळाशी शिंदे यांनी निकटचे संबंध ठेवले होते. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात आले असताना जाहीर कार्यक्रमात शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कारही केला. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट परिसरात कोविड काळात संघाशी संबंधित कार्यकर्त्यांची एक मोठी फळी कार्यरत होती. या मंडळींना हरतऱ्हेची मदत करण्यात शिंदे आणि त्यांचे समर्थक पुढे असायचे. राज्यातील राजकारणात शिवसेना वेगळ्या दिशेने निघाली असली तरी ठाण्यातील राजकारणाचा संघ आणि भाजपशी असलेल्या जुन्या मैत्रीचे बंध कायम ठेवायचे अशाच पद्धतीचे राजकारण शिंदे करत असल्याचे दिसले.

ठाणे-कल्याण-डोंबिवली पट्ट्यात मैत्रीचे बंध

रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे, डोंबिवली पट्टयात नेहमीच संघ आणि भाजपचा प्रभाव दिसून आला आहे. आनंद दिघे यांनी मात्र हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण करत भाजपच्या ताब्यात असलेल्या लोकसभा, विधानसभेच्या जागा शिवसेनेकडे खेचून घेतल्या आणि जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना मोठा भाऊ कसा राहील याची पुरेपूर दक्षता घेतली. दिघे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतलेले एकनाथ शिंदे यांनीही पक्षाचा प्रभाव अजिबात कमी होऊ दिला नाही. मात्र संघाशी संबंधित संस्था, कार्यकर्ते यांच्याशी संबंध उत्तम कसे राहतील याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. संघाच्या प्रभात बैठकांना हजेरी लावणे, ठाणे-कल्याणातील संघनिष्ठांशी संवाद साधणे, भाजपचे नेते-आमदार यांच्याशी सलोख्याचे संबंध रहातील अशाच पद्धतीने शिंदे यांचे राजकारण सुरू राहिले. शिवसेना-भाजपच्या मैत्री काळात जागा वाटप अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा वाटा देताना शिंदे यांनी भाजप फारसा दुखावला जाणार नाही ही काळजी घेतली.

राष्ट्रवादीशी कधीही सख्य नाही

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे हा प्रश्न शिवसेनेपुढे होता. त्यावेळी राजकारणाची बाराखडी देखील गावी नसलेल्या पुत्राला रिंगणात उतरविण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. भाजप-संघनिष्ठांची एक मोठी फळी कल्याण डोंबिवलीत प्रभावी राहिलेली आहे. हिंदुत्ववादी विचारांचा पगडाही या शहरांवर आहे. त्यामुळे ठाण्यापेक्षा कल्याण आपल्या मुलासाठी अधिक सुरक्षित राहील हे शिंदे यांनी जोखले होते. त्यानंतर झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिंदे आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतरही शिंदे यांनी डोंंबिवलीतील संघ-भाजप दुखावला जाणार नाही याची काळजी सतत वाहिली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार, मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाण्यात निरंजन डावखरे अशा भाजप नेत्यांसोबत संवाद उत्तम राहील अशाच पद्धतीने शिंदे यांची कार्यपद्धती राहिली. राज्य मंत्रिमंडळातील सहकारी जितेंद्र आव्हाड यांच्याशी मात्र शिंदे पिता-पुत्राचे याच काळात नेहमीच खटके उडताना दिसले. ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांसाठी शिंदे सहजासहजी उपलब्ध नसायचे. ठाणे, कल्याणच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढायच्या नाहीत असे स्पष्ट समीकरण शिंदेच्या गोटात ठरलेले आहे, असेच येथील राजकीय वर्तुळात बोलले जात असे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अनेकदा तशी जाहीर भूमिका मांडली होती. ठाणे, डोंबिवलीत आघाडी करणार नाही आणि तशी ती करायला भाग देखील पाडू नका असा ‘आवाज’ही खासदार शिंदे जाहीर बैठकांमधून देत असत. वेळ आली तर टोकाची भूमिका घेतली जाईल असा संदेश यानिमित्ताने दिला जात होता.

शिवसेना नेत्यांविरोधात राज्यभर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते ठाण्याच्या वाट्याला फारसे जात नसत. शिंदे पिता पुत्रांविरोधात भाजपचे स्थानिक नेते कधी तरी आक्रमक भूमिका घेताना दिसायचे, मात्र प्रदेश नेत्यांकडून फारशी साथ मिळत नसल्याने काहीतरी ‘शिजतय ’ याची जाणीव अनेकांना होत होती. नगरविकास खाते एमएमआरडीए यांच्या कारभारातील आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढली होती. भाजपचे प्रदेश नेतेही योग्य संधीची वाट बघत होते. विधान परिषद निवडणूक ही एक संधी भाजप आणि भाजपचे मित्र असलेले एकनाथ शिंदे यांना मिळाली आणि सोमवारी याची प्रचीती अनेकांना आली इतकेच.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा