पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून, उद्या पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून शुक्रवारपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

संत तुकाराम महाराज यांची पालखी नाशिकफाट्याहून दापोडीमार्गे हॅरिस पुलावरून शहरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे पहाटे बुधवारी दोन वाजल्यापासून बोपोडी चौक ते खडकी बाजार ते चर्च चौक मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी भाऊ पाटील रस्ता ते ब्रेमन चौक ते औंध मार्ग या रस्त्याचा वापर करावा. तसेच, रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता आणि ब्रेमन चौक सुरू असून नागरिकांनी या परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चर्च चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौकादरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली असून, बोपोडी चौकातून मुंबईकडे जाणार्‍या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्याने औंधमार्गे मुंबईकडे जावे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चौक ते शाहीर अमर शेख चौक-कुंभारवेस चौक आणि आरटीओ चौक ते जहांगीर चौक ते बंडगार्डन पूल ते गुंजन चौक हा मार्ग सुरू राहणार आहे. तसेच, पर्णकुटी चौक ते बंडगार्डन पूल ते महात्मा गांधी चौक हा मार्गदेखील सुरू राहणार आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दिघी-कळस फाटा परिसरातून शहरात येणार असल्यामुळे कळस फाटा ते होळकर पूल आणि साप्रस चौकी रस्ता बंद असणार आहे. नागरिकांनी धानोरी रस्ता, कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता, पर्णकुटी चौक ते गुंजन चौक ते कारागृह रस्ता ते विश्रांतवाडी रस्ता या मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत.

तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौकादरम्यान वाहतुक बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल ते नळस्टॉप ते सेनापती बापट रस्त्याने इच्छित स्थळी जावे. शनिवारवाडा ते कुंभार वेस मालधक्का चौक ते रेल्वे स्थानक ते जहांगीर चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक या मार्गाचा वापर करावा. तर, कुंभारवेस ते पवळे चौक ते फडके हौद चौक हा मार्ग सुरू असणार आहे. म्हात्रे पूलमार्गे ना.सि. फडके चौक ते नाथ पै चौक ते शास्त्री रस्ता ते सेनादत्त पोलिस चौक ते म्हात्रेपूलमार्गे नळ स्टॉपकडे जावे शिवाजी रस्त्याने जिजामाता चौक ते बेलबाग चौकाकडे जाण्यासाठी फुटका बुरूज ते गाडगीळ पुतळा किंवा नदीपात्रातील रस्त्याचा वापर करावा. त्याचप्रमाणे जिजामाता चौक ते फडके हौद चौकाचा मार्ग वापर करावा. संत कबीर चौक ते रास्ता पेठ चौक ते सेव्हन लव्हज चौक हा मार्ग सुरू असणार आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय चौक ते तुकाराम पादुका चौकादरम्यान वाहतुक बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी रेंजहिल रस्ता ते खडकी पोलिस स्टेशन अंडरसाप ते पोल्ट्री चौक ते जुना मुंबई-पुणे रस्ता आणि सेनापती बापट रस्ता ते नळ स्टॉप चौक या रस्त्याचा वापर करावा. तसेच, खंडोजीबाबा चौक ते कर्वे रस्ता ते सेनापती बापट रस्ता, रेंजहिल या मार्गाचा वापर करावा. गाडगीळ पुतळा ते स.गो. बर्वे चौकादरम्यान रस्ता बंद असून नागरिकांनी गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक ते आरटीओ चौक ते जहांगीर मार्गाचा वापर करण्यात यावा. डेक्कन वाहतुक विभाग ते थोपटे पथ चौकादरम्यान वाहतुक बंद असून, घोले रस्ता व आपटे रस्त्याचा वापर करावा. कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक हे मार्ग बंद करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुंभारवेस ते पवळे चौक ते फडके हौद चौकाचा मार्ग करावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा