पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा बुधवार आणि गुरुवार (दि.22 आणि दि.23) पुण्यात मुक्कामी आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानुसार वारकर्यांच्या सोयी-सुविधांसाठी ‘आषाढी वारी 2022’ या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे.
कोरोना प्रादुर्भावानंतर प्रथमच पंढरपूरपर्यंत पायी पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. त्यानुसार काल श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी प्रस्थान झाले आहे. दोन वर्षांच्या कालखंडानंतर परंपरेनुसार पालखी मार्गस्थ होणार असल्याने वारकर्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. नेहमीपेक्षा यंदा वारकर्यांची संख्या जास्त असल्याने गर्दीच्या पार्श्वभूमीवर वारकर्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सोयी-सुविधांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे वेळापत्रक, मार्ग, मुक्काम, तेथील सोयी, गावनिहाय नकाशा, पालखी सोहळा प्रमुखांचे नंबर पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर विठ्ठल दर्शनाची सोय आदींची माहिती प्राप्त होणार आहे. तसेच आरोग्य अधिकारी, फिरते पथक, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाण्याची सुविधा, टँकर, अन्न पुरवठा, विद्युत सेवा, पशुधन आदींच्या सेवेबाबत अधिकार्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच पोलिस प्रशासन, मदत, आपत्ती काळात मदतीसाठीच्या कक्षाचे देखील क्रमांक देण्यात आले असून वारकर्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून स्थानिक पातळीवर अधिकारी, पोलिस प्रशासन तैनात करण्यात आले.
भाविकांनी मोबाईलमध्ये प्ले-स्टोअररवर जाऊन आषाढीवारी अॅप डाऊनलोड करावे, तसेच अडचणीच्या वेळी थेट अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन उद्या शहरात होत असल्यामुळे पुणे पोलिसांकडून संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, त्यावर वाहतूक व्यवस्थेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी diversion.punepolice.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले असून, त्याद्वारे वाहतुकीच्या मार्गांची आणि पालखी मार्गाची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाणार असल्याचे पालिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.