पालखी मुक्कामी विशेष लक्ष असणार

पुणे : शहरामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर रस्त्यावर अन्न शिजवून विकण्यास बंदी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन अशा विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. शहरात पालख्यांसाठी हजारो वारकरी येत असतात. पालखी सोहळा पाहण्यासाठी सुध्दा हजारो नागरिक रस्त्यावर येत असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. पालखी मार्गावर एकही अतिक्रमण असणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे वारकर्‍यांना त्रास होणार नाही याची खबरदारी महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वारकरी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात येतात. रस्त्यावर अन्न शिजवण्याचे प्रकार होत असल्यामुळे याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याचा नवीन घेण्यात आला आहे. विशेष करून पालखीचा मुक्काम ज्या भागात असणार आहे त्या भागात महापालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. रस्त्यावर अन्न शिजवण्यात येत असल्यास सिलिंडर जप्त करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा